१२ डिसेंबरपासून सुरू आहे शिबिर
माय नगर वेब टीम
पारनेर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खा.नीलेश लंके व राणी लंके यांच्या संकल्पनेतून नीलेश लंके प्रतिष्ठाण व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गेल्या २२ दिवसांपासून आयोजित करण्यात येत असलेल्या नेत्र तपासणी शिबिरात मोतीबिंदूचे निदान झालेल्या पहिल्या ३० रूग्णांना शस्त्रक्रियेसाठी शुक्रवारी पुण्याकडे रवाना करण्यात आले. खा. नीलेश लंके यांनी या रूग्णांना शुभेच्छा देत निरोप दिला.
यावेळी बोलताना खा. लंके यांनी सांगितले की, गेल्या २२ दिवसांत १९ हजार ५०० रूग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १६ हजार ५०० रूग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. २ हजार २०० रूग्णांचे मोतीबिंदूचे निदान झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यापैकी पाहिल्या ३० रूग्णांना आज पुण्याकडे शस्त्रक्रिया करण्यासाठी रवाना करण्यात येत आहे. शस्त्रक्रियेसाठी पुण्यातील देसाई हॉस्पिटलशी करार करण्यात आला असून तिथे या रूग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे लंके यांनी सांगितले.
खा. लंके पुढे म्हणाले, गेल्या २२ दिवसांमध्ये विविध गावांमध्ये घेण्यात आलेल्या या शिबिरास अत्यंत चांगला प्रतिसाद लाभला. ग्रामीण भागात विशेषतः ज्येष्ठ नागरीकांची साधारणतः दहा वर्षापूर्वी डोळे तपासणी करण्यात आलेली असते. दहा वर्षापूर्वीचाच चष्मा दोरी लाऊन कसातरी वापरण्याचा प्रयत्न ज्येष्ठ नागरीक करतात हे आपण पाहतो. त्यामुळे नगर दक्षिण मतदारसंघात किमान एक लाख रूग्णांची तपासणी करून त्यांना मोफत चष्मा वाटप व मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला असल्याचे खा. लंके म्हणाले.
आज तालुक्यातील ज्येष्ठ मंडळी मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी जात असून नीलेश लंके प्रतिष्ठाणचे सर्व पदाधिकारी तसेच डॉ. बाळासाहेब कावरे यांनी परिश्रम घेत खेडया पाडयांतील वंचितांना, गरीबांना या शिबिराचा लाभ कसा होईल याची काळजी घेतली असल्याचे सांगत लंके यांनी आपल्या सहकार्यांचे कौतुक केले.
लोकसभा मतदारसंघात शिबिरे
येत्या ५ जानेवारी रोजी पारनेर-नगर मतदारसंघातील शिबिराचा समारोप होणार असून त्यानंतर पाथर्डी-शेवगांव मतदारसंघात शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर सोईने श्रीगोंदे-नगर, राहुरी-पाथर्डी-नगर, कर्जत-जामखेड व नगर शहरात शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
रूग्णांसाठी सर्व सुविधा
मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे निदान झालेल्या रूग्णांना पारनेरहून बस, पुण्यात पोहचल्यानंतर निवास, जेवण, औषधे, शस्त्रक्रिया या सर्व सुविधा मोफत देण्यात येणार असून तिसऱ्या दिवशी या रूग्णांना पुन्हा पारनेर येथे आणण्याची सोय नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आली आहे.