विधानसभेच्या तोंडावर महायुतीत वादाच्या ठिणग्या?

शिवसेनेकडून अजितदादा टार्गेट / थोरातांनीही केला हल्लाबोल / पक्ष फोडाफोडीचे राजकारण फडणवीसांना भोवणार? अर्थखात्यासारखं नालायक खाते नाही असं का म्हणालेत मंत्री गुलाबराव पाटील?
माय नगर वेब टीम
अहमदनगर – लोकसभा निवडणुकीपाठोपाठ आता विधानसभा निवडणुकीची चाहूल लागलीय. त्यासाठी माहोलही तयार झालाय.आगामी विधानसभा निवडणूक ही मुदतीतच होईल असे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून सांगितले जातेय. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता वर्तविली जातेय. त्या अनुषंगाने महायुती व महाविकास आघाडी कामाला लागलीय. विधानसभा तोंडावर आली असतांनाच महायुतीमध्ये वादाच्या ठिणग्या पडायला सुरुवात झालीय. शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांकडून अजित दादांना टार्गेट केले जातेय. मंत्री शंभूराज देसाईं यांच्यापाठोपाठ आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आता अजित पवारांना टार्गेट केलेय. अर्थ खात्यासारखं नालायक खातं नसल्याचे सांगत पवारांवरच त्यांनी हल्ला चढवला. शिवसेना शिंदे गटाकडून अजित पवारांना का केले जातेय टार्गेट? थोरातांनी काय साधलाय निशाना? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पक्ष फोडाफोडीचे राजकारण भोवणार का?

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला जबदस्त फटका बसला. तर महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये अद्यापी उत्साह दिसून येतोय. त्याला कारणही तसंच आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बोलबाला असतांना राज्यात मिळालेले यश. लोकसभा निवडणुकीला मिळालेले यशामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला यश मिळेल असे राजकीय जाणकारांकडून बोलले जातेय. महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन कितीही ताणाताणी झाली तरी विधानसभा निवडणूक ते एकत्रितच लढतील असाय सध्याचा कयास दिसून येतोय. तर दुसरीकरडे मात्र महायुतीमधील घटक पक्षात म्हणजेच शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वादाच्या ठिणग्या पडायला सुरुवात झालीय.

राज्यात नुकतीच सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणली. या योजनेच्या माध्यमातून 18 वर्ष पूर्ण झालेल्या व 60 वर्षापर्यंतच्या महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 हजार रुपये मिळणार आहेत. योजनेत अर्ज भरलेल्या बहुतांश महिलांना पहिले दोन हप्तेही महिलांच्या खात्यावर जमा झालेत. परंतू, या लाडकी बहिण योजनेवरुन महायुतीमध्ये वादंग सुरु झालेय.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अमलात आणण्यासाठी महायुतीतील सर्र्वच पक्षांनी विधानसभा मतदारसंघ निहाय, गावोगावी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनजागृती केली. महिलांचे अर्जही भरुन घेतले असून लाडक्या बहिणींना पहिले दोन हप्ते मिळवूनही दिले. परंतू, योजनेच्या नावातून मुख्यमंत्री हा शब्द राष्ट्रवादी व भाजपाचे पदाधिकारी जाहीर कार्यक्रमात वगळत असल्याचे पहावयास मिळतय. अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा प्रचार करतांना जाणूनबुजून मुख्यमंत्री हा शब्द वगळला. त्यावरुन मुख्यमंत्री शिंदे गटाच्या आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय.

शिंदे गटाचे मंत्री शंजूराज देसाई यांनी हे आम्हाला खटकलं असल्याचं म्हणत अजित पवार गटावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांना ‌‘मुख्यमंत्री’ हा एक शब्द जड नव्हता. केंद्राच्या योजनांमध्ये पंतप्रधान शब्दाचा उल्लेख असतो, तर राज्याच्या योजनांमध्ये मुख्यमंत्री शब्दाचा उल्लेख असतो. असं म्हणत शंभूराज देसाई यांनी संताप व्यक्त केलाय. तर सातारा व बारामती येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमामध्ये लावलेल्या लाडकी बहिण योजनेच्या बॅनरवर मुख्यमंत्री हा शब्द वगळल्याचे पहावयास मिळाले. यावरुन महायुतीत सर्व काही आलबेल आहे असे वाटत नाही. तर जळगावमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्यासारखं नालायक खाते नाही असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्यावरच निशाणा साधलाय. शिंदे गटाच्या आमदारांकडून होत असलेल्या आरोपांवर अजित पवार यांनीही पदाधिकाऱ्यांनी लाडकी बहिण योजनेत मुख्यमंत्री हा शब्द ठेवण्याचे सांगितल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री या शब्दावरुन महायुतीत वादावादी सुरु असतांनाच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही यात उडी घेतलीय. मंत्री गुलाबराव पाटील अर्थमंत्र्यांबाबत जे बोलले ते बरोबरच असून मी त्याचे समर्थन करतो असे थोरात म्हणालेत. केवळ महायुतीतच नाही तर आघाडीचे सरकार असतानाही अर्थ खात्याने मनमानी कारभार केलाय असेही मत थोरात यांनी अर्थमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता नोंदवलेय. राज्यातील या पाच वर्षांतल्या राजकारणाची सर्वात दुर्दैवी राजकारण म्हणून इतिहासात नोंद होईल अशीही खंत त्यांनी व्यक्त केलीय. अर्थ खात्याचे काम पाच वर्षात कधीही न्यायाचे झाले नाही. सर्व राज्याला समान न्याय या तत्वाने कारभार न करता फक्त आपल्याच मर्जीतल्या लोकांना वारेमाप निधी दिला गेला. मात्र या विकासकामांतही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा गंभीर आरोप थोरात यांनी केलाय.

देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलतांना थोरात म्हणालेत की फडणवीस राज्याचे मंख्यमंत्री राहिले आहेत. आज जी परिस्थिती त्यांच्यावर आली आहे ती त्यांच्याच पक्षाने आणलीय. राज्यात नको ते उद्योग करण्याची जबाबदारी भाजपच्या नेतृत्वाने त्यांच्यावर टाकली. पण शेवटी तेच अडचणीत आले ही आजची वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे पक्ष फोडाफोडीचे त्यांचे राजकारण महाराष्ट्रातील जनतेलाही आवडलेले नसल्याने फडणवीस चक्रव्युहात अडकले असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय.