माय नगर वेब टीम
IND W vs WI W 2nd T20I Highlights : तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या महिला संघाने टीम इंडियाचा 9 गडी राखून पराभव केला. भारतीय संघाने पहिला सामना जिंकला होता, मात्र वेस्ट इंडिजने पलटवार करत दुसऱ्या सामन्यातील विजयासह मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आता या मालिकेतील तिसरा टी-20 सामना हा निर्णायक ठरणार आहे. हा सामना गुरूवारी(19 डिसेंबर) सांयकाळी 7 वाजता खेळवला जाईल.
या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी अगदी योग्य ठरला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने 20 षटकात 9 बाद 159 धावा केल्या होत्या. कर्णधार स्मृती मंधानाने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि 41 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 62 धावा केल्या. तिने 37 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले हे तिचे 29वे अर्धशतक ठरले.
ऋचा घोषने 17 चेंडूत 6 षटकारांच्या मदतीने 32 धावा केल्या. याव्यतिरिक्त दीप्ती शर्माने 15 चेंडूंत दोन चौकारांसह 17 तर जेमिमाहने 15 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 13 धावा केल्या. इतर खेळाडूंना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. या काळात वेस्ट इंडिजच्या चार गोलंदाजांनी (चिनेल हेनरी, डिएंड्रा डॉटिन, हैली मैथ्यूज, अफी फ्लेचर) प्रत्येकी 2-2 बळी घेतले. टीम इंडियाने एक विकेट रनआउट स्वरूपात गमावली.
वेस्ट इंडिजने गाठलं सहज लक्ष्य…
लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार हिली मॅथ्यूज आणि कियाना जोसेफ यांनी वेस्ट इंडिजला चांगली सुरुवात करून दिली. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी 66 (40 चेंडू) धावांची भागीदारी केली. वेस्ट इंडिजला पहिला धक्का 7व्या षटकात, कियाना जोसेफ पॅव्हेलियनमध्ये परतल्यावर बसला. कियाना जोसेफ हिने 22 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 38 धावा केल्या. त्यानंतर शमायन कॅम्पबेलने हिली मॅथ्यूजसह दुसऱ्या विकेटसाठी 94* (55 चेंडू) धावांची अखंड भागीदारी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. यादरम्यान कर्णधार हीली मॅथ्यूजने 47 चेंडूंत 17 चौकारांच्या मदतीने नाबाद 85* धावा केल्या तर शमाईन कॅम्पबेलने 26 चेंडूंत 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 29* धावांची खेळी केली.