धनंजय मुंडेंबद्दलचं ‘ते’ वक्तव्य भोवलं; मनोज जरांगेंविरोधात गुन्हा…

माय नगर वेब टीम
बीड : मनोज जरांगे यांच्याविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना धनंजय मुंडेंबद्दलचं एक वक्तव्य भोवलं आहे. त्यांच्यावर बीडच्या परळी शहरात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणीमध्ये झालेल्या जाहीर सभेत जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्याबद्दल अपशब्द वापरत घरामध्ये घुसून मारू, असे शब्द वापरले होते. याप्रकरणी तुकाराम आघाव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोज जरांगे, अंजली दमानिया, सुरेश धस, बजरंग सोनावणे, संदीप क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी बीडच्या परळी शहर पोलीस ठाण्यासमोर मुंडे समर्थक आक्रमक झाले होते. जातीय तेढ निर्माण करणाऱ्या नेत्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत मुंडे समर्थकांकडून आंदोलन करण्यात आले होते. तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही आंदोलकांनी केली.