पीकविम्यापासून शेतकरी वंचित; संतप्त शेतकऱ्यांनी घेतली आक्रमक भूमिका, पहा काय दिला इशारा…

अहमदनगर : प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाच्या निवारणार्थ, २२ जुलै रोजी जिल्हा कृषी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी केली आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे यांना निवेदन दिले आहे.

या आंदोलनात अॅड. शिवाजीराव काकडे, अशोकराव ढाकणे, अकबर भाई शेख, बाळासाहेब नरके आणि इतर शेतकरी नेते उपस्थित होते. हर्षदा काकडे म्हणाल्या की, शेवगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना पीकविमा मिळत नाही. कांबी गावातील ६०-७० शेतकऱ्यांनाच विमा मिळाला, तर इतर शेतकऱ्यांना नाही. शेतकऱ्यांनी विमा भरण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता केली, तरीही फक्त काही शेतकऱ्यांनाच विमा मिळतो.

काकडे यांनी असेही नमूद केले की, शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत तक्रार करावी लागते, परंतु या तरतुदीची माहिती शेतकऱ्यांना दिलेली नाही. त्यामुळे वस्तीवर दूर राहणाऱ्या शेतकऱ्यांना तक्रार करता येत नाही. त्यामुळे विमा योजनेमध्ये पीक विम्याचा लाभ देण्यासाठी गाव हा घटक धरावा.

जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारी मान्य करत, पिक विमा योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्याकडे प्रस्ताव मांडण्याचे मान्य केले. त्यांनी शेतकऱ्यांना अन्याय होऊ देणार नाही, अशी हमी दिली.

या बैठकीत ओरिएंटल इन्शुरन्सचे विभागीय व्यवस्थापक सुहास थूल, अॅक्सिस बँकेचे अधिकारी आणि इतर विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली, ज्यामध्ये शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाचे निवारण करण्याची हमी देण्यात आली.