माय नगर वेब टीम
Rain update : जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दडी मारली परंतू दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली. आता हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी पुढील आठवड्यात राज्यात दमदार पाऊस होईल असा शेतकऱ्यांना दिलासादायक इशारा दिला आहे. तसेच 26 जुलैपर्यंत पाऊस चांगला पाऊस होईल अंसा अंदाज व्यक्त केला आहे.
यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्याने खरीपाच्या पेरण्यांनी चांगलाच वेग घेतला. आत्तापर्यंत 103 टक्के खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. यात कडधान्य पिकांनी शंभरी गाठली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातील चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या. परंतू, पेरण्यानंतर पावसाने दडी मारल्याने काही ठिकाणी दुबार पेरणी करण्याची वेळ आली. पावसाअभावी पिकांनीही माना टाकल्या होत्या. शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. दरम्यान रविवारी, सोमवारी राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली त्यामुळे खरीपाच्या पिकांना जीवदान मिळाले.
आत्तापर्यंत अहमदनगर जिल्ह्यात 45 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. धरणांत नवीन पाण्याची आवक सुरु झाली आहे. असे असले तरी उत्तरेतील मुळा व भंडारदरा धरण पाणलोटात पावसाचा जोर अद्यापही कमीच आहे. रविवारी-सोमवारी झालेल्या आषाढ सरींमुळे खरीपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे.
दरम्यान आज हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी 14 ते 20 जुलै दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात दमदार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. तसेच आजपासून पावसास सुरुवात होणार असून 26 जुलैपर्यंत पाऊस होईल असा अंदाज वर्तविला आहे. दरवर्षी आषाढी वारीच्यावेळी राज्यात पाऊस होत असतो. यंदाही आठवडाभर दमदार पाऊस होऊन ओढे, नदी नाले वाहते होतील. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण विभागात पाऊस होईल असा अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.