माय नगर वेब टीम
मुंबई – Maharashtra Politics :राज्यातील विधान परिषदेच्या 11 जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय झाला तर महाविकास आघाडीत फाटाफुट झाल्याचे पहावयास मिळाले. त्यात काँग्रेसची मते फुटल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची काँग्रेसच्या हायकमांडने गंभीर दखल घेत गद्दारांना घरी पाठवा असे आदेश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत महायुतीने दिलेले 9 उमेदवार निवडून आले. तर महाविकास आघाडीतील शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला. त्यांना अवघी 12 मते मिळाली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली. काँग्रेसने मुसंडी मारल्याने भाजपाचे 400 पारचे स्वप्न भंगले. 300 पेक्षा कमी जागांवरच भाजपाला रोखले. यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा करिष्मा दिसून आला. लोकसभेला दिलेला कौल मान्य करत महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीच तयारी चालविली आहे. असे असतांनाच शुक्रवारी झालेल्या या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. शेकापचे जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची 8 मते फुटल्याचे समोर आले आहे.
याबबतची सविस्तर अहवाल राज्यातील प्रदेशाध्यक्षांकडून हायकमांडला दिला जाईलच. परंतू, मते फुटल्यामुळे महाविकास आघाडीतील एका उमेदवाराचा पराभव हायकमांडच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. याची दखत घेते फुटलेल्या आमदारांवर तातडीने कारवाई करा असे आदेश काँग्रेस हायकमांडने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले आहेत.
निवडणुकीनंतर जयंत पाटील यांच्या पराभवाचे चिंतन करण्यात आले. या बैठकीला नाना पटोले, विरोधीपक्षनेते विजय विडेट्टीवर, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आदींसह महत्वाच्या नेत्यांची उपस्थिती होती. राज्यात काँग्रेसला सर्वाधिक 13 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला दिवस चांगले आहेत. असे असतांनाही विधान परिषदच्या निवडणुकीत मते फुटलीच कशी असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे फुटीर आमदारांना शोधून त्यांच्यावर तातडीने कारवाई करा, अशा सूचना देखील काँग्रेस हायकमांडने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिल्या. याअगोदरही काँग्रेसचीच मते फुटली होती. त्यामुळे आता हे मते फाटाफुटीचे प्रकरण काँग्रेस हायकमांडने गांभीर्याने घेतले असून कोणत्या आमदारांवर कारवाई होते हे आता पाहणे महत्वाचे ठरणार आहे.