माय नगर वेब टीम
विकास चोभे
लोकसभा निवडणुकीत नीलेश लंके यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांचा पराभव करुन दणदणीत विजय मिळविला. त्यामुळे आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार कोण याबाबत चर्चा सुरु झाल्या होत्या. या चर्चांना आता पुर्णविराम मिळाला आहे. शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी पारनेरमधून राणी लंके तर श्रीगोंद्यातून शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते विधानसभेत जातील असा दावा केला आहे. खा. राऊत यांच्या या विधानामुळे पारनेर व श्रीगोंद्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते साजन पाचपुते यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन खा. संजय राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार सुनील शिंदे, वसंत तात्या मोरे, उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले, माजी जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक योगीराज गाडे, शरद झोडगे, टिळक भोस, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विविध पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
श्रीगोंद्याची काय परिस्थिती झाली आहे हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत नकली पाचपुते ला बाजुला करुन असली पाचपुते यांना आमदार करणार असल्याचे खा. राऊत यांनी सांगितले.
खा. राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पारनेरमधून राणीताई लंके तर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून उपनेते साजन पाचपुते यांच्या उमेदवारीवर एक प्रकारे शिक्कामोतर्बत झाले असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या विरोधात महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळते हे आता पाहणे महत्वाचे ठरणार आहे.