माय नगर वेब टीम
अहमदनगर : गेल्या दोन दिवसांपासून राज्यासह अहमदनगर जिह्यात होत असलेल्या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. सतत होत असलेल्या पावसामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे. मात्र दमदार पावसाची अजून प्रतिक्षाच आहे. अजूनही काही ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु आहेत. जिल्ह्यात सरासरी 50 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच दमदार पावसाने सुरुवात केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या लवकच उरकल्या. परंतू पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याचे चित्र निर्माण झाले होते. पिकांनीही माना टाकल्या होत्या. शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. जुलै महिन्याचा पहिला आठवडा कोरडाच गेला. परंतू दुसऱ्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बळीराजा दिलासा मिळाला. आता पुन्हा 26 जुलैपर्यंत अहमदनगर जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात दमदार पाऊस होईल असा अंदाज हवामानतज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तविला आहे.
तसेच उद्यापासून 18 जूलैपर्यंत दमदार पाऊस होईल असा इशारा दिला आहे. तसेच शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही असे सांगण्यात आले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात सरासरी 54 टक्के पाऊस झाला आहे. 124 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. जामखेडला सर्वाधिक 142 टक्के पाऊस झाला आहे तर राहात्यात सर्वात कमी 26 टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे.
धरणसाठ्यात वाढ
अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरणारी मुळा व भंडारदरा धरण पाणलोटात गत आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे धरणात नवी पाण्याची आवक झाली असून पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात का होईना सुटला आहे.