माय नगर वेब टीम
पुणे- Maharashtra Rain Update: राज्यात विश्रांतीनंतर पावसाचे पुन्हा एकदा जोरदार आगमन झाले आहे. तसेच राज्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे. राज्यातील काही भागात रेड अलर्ट तर काही भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
यंदा पावसाळ्याच्या सुरुवातील पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच मान्सून पुर्व पावसानेही हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीपाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतू, खरीपाच्या पेरणीनंतर पावसाने दडी मारली. पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. गत आठवड्यात अहमदनगरसह राज्यात ठिकठिकाणी कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बळीराजाला काही प्रमाणात दिलासा मिळाला. परत राज्यात मान्सून सक्रीय होण्याची चिन्हे दिसू लागले आहेत. नैऋत्य मोसमी वारे सक्रीय झाले आहेत. शनिवारी रत्नागिरी, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये रेड अलर्ट दिला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. ठाणे, रायगडे, सातारा, सिंधुदुर्ग, अमरावती, नांदेड, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
कमी दाबाच्या पट्यामुळे कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीवर शुक्रवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली. घाटमाथ्यावर कमी अधिक प्रमाणात 100 मिलीमिटर पावसाची नोंद झाली.
अहमदनगर जिल्ह्यात 22 जुलैपर्यंत कमी अधिक प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. जिल्ह्यात पाऊस होत असला तरी अद्यापही पिण्याच्या पाण्याची चिंता मिटलेली नाही. त्यामुळे दमदार पावसाची अद्यापही प्रतिक्षाच आहे.
कुठे कोणता अलर्ट
रतागिरी, भंडारा, गोंदिया, गडचिरोली चंद्रपूर येथे रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, गडचिरोली, मुंबई, पालघर, पुणे, कोल्हापूर, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, धुळे, जळगाव, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, भंडारा, गोंदिया या ठिकाणी ऑरेंट अलर्ट देण्यात आला आहे.