Maharahstra Politics: विधानसभेसाठी भाजपाचा तगडा प्लॅन! एकनाथ शिंदे, अजितदादांना बसणार मोठा फटका…

माय नगर वेब टीम
मुंबई –  Maharahstra Politics : लोकसभा निवडणुकीमध्ये सपाटून झटका बसल्यानंतर आता भाजपाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मायक्रो प्लॅनिंग चालविले आहे. तशा पद्धतीने मतदारसंघात यंत्रणा आखली जात आहे. विधानसभा निवडणुकीत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपा तब्बल 160 जागांवर निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहेत. तसेच मित्रपक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना अपेक्षापेक्षा कमीच जागांवर समधान मानावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वांधिक फटका भाजपाला बसला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडे जोरदार तयारी चालविली आहे. कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणुकीवर भाजपाचा झेंडा फडकावयाचा असा निश्चित भाजपाच्या नेत्यांनी केला आहे. त्यासाठी मित्र पक्षांकडील मतदारसंघ वगळता इतर तब्बल 150 ते 160 जागांवर मायक्रो प्लॅनिंग करत नियोजन केले जात आहे.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून 100 जागांवर दावा सांगितला आहे. तर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या पक्षातील नेत्यांनी 70 पेक्षा अधिक जागांवर दावा ठोकला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणेच शेवटच्या टप्प्यापर्यंतही महायुतीतील जागा वाटपाचा घोळ सुरुच राहणार असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी आगामी विधानसभा निवडणूक महायुती एकत्रितच लढणार असल्याचे आता स्पष्ट होवू लागले आहे. त्या अनुषंगाने राज्यात महायुतीच्या नेत्यांकडून दौरे सुरु झाले आहेत.

महायुतीत सर्वांधिक जागा भाजपा लढवणार आहे. त्यांनी 150 ते 160 जागांवर तयारी सुरु केली आहे. तर 130 ते 133 जागा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गट व मित्र पक्षाला दिल्या जातील असे सांगितले जात आहे. एकिकडे जागावाटपाचे त्रांगडे अद्याप मिटले नसले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आगामी सरकार हे महायुतीचेच येणार असल्याचे छातीठोकपणे सांगितले आहे.

सध्या भाजपाचे 105 आमदार आहेत.0 मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत 40 आमदार आहेत. तर अजित दादांसोबत 39 आमदार आहेत. सध्याच्या विद्यमान आमदारांच्या तिकीटात बदल केला तरी त्या जागा आहे त्याच पक्षाला राहितील. दुसरीकडे लोकसभेच्या निकालामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील पक्षही एकत्रितच लढतील असा अंदाज बांधला जात आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून मतदारसंघामध्ये मातब्बर नेत्यांसमोर कोणला उतरवले जाते हे आता पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

विधानसभेला कोणाला बसणार फटका….
लोकसभा निवडणुकीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांना व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळाल्याचे पहावयास मिळाले. त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या उमेदवारांना झाला. तर महायुतीतील भाजपा, शिवसेना एकनाथ शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठ्या प्रमाणात फटका बसला. महाविकास आघाडी एकसंघ राहिल्यास विधानसभा निवडणुकीतही मोठा फटका बसू शकतो असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तविला जात आहे. परंतू, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोणता डाव टाकतेय हे आता पहाणे महत्वाचे ठरणार आहे.