माय नगर वेब टीम
अहमदनगर : लोकसभा निवडणूक झाली आता विधानसभा निवडणुकीचं वार सुटलंय. त्यामुळे म्हणजेच अहमदनगर शहरातून डझनभर उमेदवार आमदारकीला इच्छुक झाले आहेत. यात महायुतीकडून आमदार संग्राम जगताप यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जातं आहे. तर महाविकास आघाडीकडून कोण असा प्रश्न सर्वच नगरकरांना पडला आहे? नगरमधून विधानसभेसाठी शिवसेनेचे माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते इच्छुक आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी महापौर अभिषेक कळमकर, शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, भगवान फुलसौदर, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे तसेच दिवंगत नेते स्वर्गवासी अनिल भैय्या राठोड यांच्या पत्नी शशिकला राठोड या शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाकडून इच्छुक आहेत. काँग्रेसकडून शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे इच्छुक आहेत. सर्वच इच्छुकांनी आमदारकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. या नेत्यांना टक्कर द्यायची आहे ते सध्याचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना. परंतु हे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या समोर टिकतील का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. याचं कारण देखील असंच आहे.
2019 मध्ये अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत दिलीप सातपुते यांचा पराभव झाला आणि आता ते आमदारकीला इच्छुक आहेत. नुकतेच त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने शहर प्रमुख पदावरून हटवले आहे. त्यामुळे सातपुते हे आमदारकीला टिकतील का असा प्रश्न उपस्थित होतोय?
ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली अभिषेक कळमकर यांनी महापौर पदाची निवडणूक लढवली होती ते महापौर झाले. परंतु महापौर झाल्यानंतर पुढील मनपाची निवडणूक त्यांनी लढवली नाही? कुठेतरी असं म्हटलं जातं राजकीय पुढार्यांच्या भीतीपोटी त्यांनी मनपा निवडणूक लढवली नाही याबाबत त्यांच्यावर अनेकदा आरोप प्रत्यारोप देखील झाले.
माजी महापौर भगवान फुलसौंदर यांचा मागील मनपा निवडणुकीत नगरसेवक गणेश भोसले यांनी मोठ्या फरकांनी पराभव केला. त्यामुळे त्यांना नगरसेवक होता आले नाही. ते आमदारकी काय लढवणार अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.
शिवसेना शहर प्रमुख (ठाकरे गट) संभाजी कदम यांनी आतापर्यंत कोणतीही निवडणूक लढवली नाही. परंतु नेहमीच त्यांच्या पत्नी निवडणूक लढवतात. व त्या विजयी होतात. त्यामुळे संभाजी कदम या आमदारकीला कोणत्या मुद्द्यांवर सामोरे जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे?
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे. ते उच्चशिक्षित आहेत. काँग्रेस नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्तीय असल्याचे संबोधले जातात. परंतु त्यांच्या मागे शहर काँग्रेसची म्हणावी तितकी ताकद उभी नाही. त्यामुळे आमदार संग्राम जगताप यांच्यासमोर ते कितपट टिकतील असा प्रश्न राजकीय विश्लेषकांकडून उपस्थित केला जात आहे?
बाळासाहेब बोराटे यांचा सर्वसामान्यांचा नगरसेवक म्हणून ओळख आहे. प्रभागामध्ये त्यांची चांगली पकड आहे. सलग सात वेळा ते नगरसेवक राहिले. आत्तापर्यंत एकदाही त्यांचा पराभव झाला नाही परंतु कुठेतरी दबक्या आवाजात असं म्हटलं जातं की, आमदार अरुणकाका जगताप यांचे ते एकेकाळी खंदे समर्थक होते. त्यामुळे या शर्यतीत ते कसे टिकतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दिवंगत नेते स्वर्गवासी अनिल भैय्या राठोड यांच्या पत्नी शशिकला भाभी यांनी आत्तापर्यंत एकही निवडणूक लढवली नाही. परंतु अनिल भैय्या राठोड यांचा हिंदुत्वाचा वारसा त्यांचे चिरंजीव विक्रम राठोड यांनी सुरू ठेवला आहे. राठोड परिवाराला मानणारा आजही मोठा वर्ग अहमदनगर शहरांमध्ये सक्रिय आहे. दुसरीकडे असं म्हटलं जातं की खासदार निलेश लंके हे नेहमी म्हणायचे माझ्या राजकीय जीवनातले गुरु अनिल भैय्या होते. त्यामुळे राठोड परिवाराला निलेश लंके नक्कीच साथ देतील असं अहमदनगर शहरातील राजकीय विश्लेषक सांगताहेत. तसेच मनसेनेही स्वबळाचा नारा दिला आहे.
त्यामुळे सर्व उमेदवारांची पार्श्वभूमी पाहता आगामी विधानसभा निवडणूकही जगताप विरुद्ध राठोड अशीच होईल असा अंदाज राजकीय वर्तुळात बांधला जातं आहे.