लोकसभेला फक्त इशारा दिला विधानसभेला नाव घेऊन पाडणार असल्याचा दिला सूचक इशारा
माय नगर वेब टीम
अहमदनगर – मराठा आरक्षणासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभारला आहे. त्यासाठी जरांगे पाटलांनी मोर्चे, आंदोलने, उपोषणे केली. परंतु, अद्यापही त्यांच्या मागणीला यश आलेले नाही. आरक्षणाच्या मागणीमुळे मराठा समाज कधी नव्हे तो एकवटला. आरक्षणासाठीचा सुरु केलेला लढा लोकसभा निवडणुकीपूर्वी न संपल्याने लोकसभा निवडणुकीत सत्ताधार्यांना याचा चांगलाच फटका बसला. परिणामी अनेक मातब्बर नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. आता दोन महिन्यानंतर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाला विरोध करणार्या उमेदवारांची नावे घेऊन पाडणार, विरोध करणार्यांचा सुपडासाफ करणार असल्याचा सुचक इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे अनेक मातब्बर नेत्यांसह आमदारांना घाम फुटला आहे. जरांगे पाटीलांच्या इशार्याचा अहमदनगर जिल्ह्यातही मोठा परिणाम होवू शकतो. जिल्ह्यात कोणत्या नेत्याला बसणार धक्का त्याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट… पाहुयात सविस्तर…
गेल्या २९ ऑगस्ट २०२३ पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभारला आहे. अनेक वेळा आंदोलने, मोर्चे, उपोषण केले परंतु, अद्यापही मराठा समाजाला आरक्षण मिळालेले नाही. दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणुकीच्या अगोदर झालेल्या राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण विधेयक मांडलं. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये एकमताने मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर केलं. मराठा समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये १० टक्के आरक्षण देणारं विधेयक पारित करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल महाराष्ट्र सरकारने स्वीकारल्याचं नमूद केलं. सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत असल्याचे वारंवार सांगत आहे. परंतु, सरसकट आरक्षणाचा मुद्दा अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे जरांगे पाटील यांनी पुन्हा आरक्षणासाठी टोकाचा लढा उभारला आहे.
आता नाही तर परत कधीच नाही असे मराठ्यांना ठणकावून सांगत गट तट सोडून आपल्या लेकरांच्या उज्वल भविष्यासाठी एकत्र या असे जरांगे पाटील वारंवार सांगत आहेत. आरक्षणाच्या लढ्यासाठी राज्यभर ठिकठिकाणी शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. अहमदनगर शहरात सोमवारी जरांगे पाटील यांची भव्य शांतता रॅली पार पडली. मराठ्यांच वादळ नगरमध्ये धडकलं. चौपाटी कारंजा येथे शांतता रॅलीला जरांगे पाटील यांनी संबोधित केले. मराठा आरक्षणासाठी विरोध करणार्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. मराठा ओबीसमध्ये वाद नाहीच असे ठणकावून सांगत सत्तेतील देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ यांच्यासाठी काही मंडळी दोन समाजामध्ये वाद पेटवून देण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून आता सत्ताधार्यांसह विरोधक एकत्र आले आहेत. आत्तापर्यंत कुठे गेले होते असा खडा सवाल उपस्थित करत आता कोणाचीच गय केली जाणार नसल्याचे ठणकावून सांगितले.
मराठा आरक्षण मुद्द्याचा लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा प्रमाणात परिणाम दिसून आला असल्याचे पहावयास मिळाले आहे. मराठवाड्यातील ९ लोकसभा मतदारसंघातील तब्बल ८ मातब्बर नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. विशेष करुन याचा फटका महायुतीतीला भाजपाला चांगलाच बसला. मराठवाड्यालगतच असणार्या अहमदनगर जिल्ह्यातही आरक्षणाचा परिणाम जाणवला. आता पुन्हा जरांगे पाटलांनी आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतल्याने अहमदनगर जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांना घाम फुटला आहे. सत्ताधार्यांसह विरोधकांनाही दिलेला जरांगे पाटलांचा इशारा बरेच काही सांगून जातो.
अहमदनगर जिल्ह्यात सध्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख, प्राजक्त तनपुरे, आमदार रोहित पवार, संग्राम जगताप, मोनिका राजळे, बबनराव पाचपुते, अशुतोष काळे, डॉ. किरण लहामटे, लहू कानडे हे विधानसभेचे प्रतिनिधीत्व करत आहेत. दिवाळीनंतर विधानसभेचे राजकीय फटाके फुटतील असा राजकीय अंदाज बांधला जात आहे. जिल्ह्यात बहुतांश आमदार हे मराठा समाजाचे आहेत. परंतु आरक्षणासाठी साथ न देणार्या आणि विरोध करणार्या आमदारांना पाडा असा सुचक इशारा जरांगे पाटील यांनी दिल्याने ऐन पावसाळ्यातही आमदारांना चांगलाच घाम फुटला आहे.
थोरात, विखे, राजळे आणि पवार यांच्या मतदारसंघात जातीपातीचे राजकारण मोठ्या प्रमाणात चालते. त्यामुळे जरांगे पाटलांच्या इशार्याचा या मतदारसंघात काही परिणाम होतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील इतर मतदारसंघातही मराठा एकवटल्यास काय परिणाम होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यासाठी आपल्याला विधानसभा निवडणुकीची वाट पहावी लागणार आहे.