कृती समितीकडून गुरुवारी बैठकीचे आयोजन | देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पूर्ण करण्याची मागणी
माय नगर वेब टीम
अहमदनगर – बहुचर्चित साकळाई उपसा जलसिंचन पाणी योजनेसाठी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाळकी येथे दिलेला शब्द पूर्ण करावा. तसेच अनेक दिवसांपासून रखडलेली पाणी योजना मार्गी लागावी यासाठी साकळाई कृती समितीच्यावतीने सरकारला आठवण करुन देण्यासाठी व योजनेबाबत पुढील रुपरेषा ठरविण्यासाठी गुरुवार दि. 23 ऑगस्ट 2024 रोजी हिवरे झरे येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला लाभधारक शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन कृती समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
गेल्या 40-50 वर्षांपासून साकळाई पाणी योजनेचा प्रश्न भीजत पडला आहे. लाभधारक क्षेत्रातील 35 गावांमधील नागरिकांनी योजनेसाठी वारंवार आंदोलन, उपोषण, मोर्चे, रास्तारोको, निवेदने देऊन सरकारला आठवण करुन देण्याचे काम केले आहे. परंतु, अद्यापही साकळाई योजनेला मूर्त स्वरुप आलेले नाही. दरम्यानच्या काळात गत लोकसभा निवडणुकीच्यावेळी भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ वाळकी येथे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी फडणवीस यांनी साकळाई योजनेचा शब्द दिला होता.
त्यानंतरच्या काळात राज्यात सत्ताबदल झाल्याने साकळाई योजनेचा विषय मागे पडला. परंतु, नंतर राज्यात पुन्हा भाजपा-शिवसेनेचे सरकार आल्याने माजी खासदार सुजय विखे पाटील, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकार दरबारी हालचाली करत साकळाई योजनेसाठी लागणारे पाणी कागदोपत्री उपलब्ध असल्याचे दाखविले. त्यासाठी आमदार बबनराव पाचपुते, भाजपाचे नेते शिवाजी कर्डिले यांनीही पाठपुरावा केला. तसेच साकळाईच्या सर्व्हेचे आदेश काढले. साकळाईच्या सर्व्हेक्षणासाठी निधी टाकून सर्व्हेक्षणाचे कामही पूर्ण झाले आहे. आता योजनेसाठी पाणी उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. याची गेल्या सहा महिन्यांपासून मागणी होत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर साकळाई योजनेसाठी कृती समितीसह, शेतकरी यांनी आक्रमक भूमिका घेतली असून गुरुवारी योजनेसाठी पाणी उपलब्ध प्रमाणपत्र मिळण्यासाठी व पुढील नियोजन ठरविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेबाबत दिलेला शब्द पूर्ण करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीला कृती समितीचे अध्यक्ष हभप बाबा महाराज झेंडे, नारायण रोडे, संतोष लगड, सोमनाथ धाडगे, सरपंच सुरेश काटे, धामणे सर, ज्ञानदेव भोसले, शिवाजीराव विधाटे, रामदास झेंडे, रोहिदास उदमले, अमोल लंके, सोन्याबापू वाणी, राजेंद्र झेंडे, पुरुषोत्तम लगड, प्रतापराव नलगे आदी उपस्थित होते.