राज्याच्या राजकारणात खळबळ उडविणारा सर्व्हे आला समोर / शिवसेनेसह अजितदादांना धोक्याची घंटा / लाडकी बहिण कोणाला देणार मतांचे गिफ्ट?
माय नगर वेब टीम
मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत सत्ता ताब्यात घेण्यासाठी महाविकास आघाडीसह महायुतीने कंबर कसली आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु असल्याचे दररोजच्या घडामोडींवरुन दिसून येते. परंतू, अशाचत एक धक्कादायक सर्व्हे समोर आलाय. त्या सर्व्हेमध्ये सर्वांधिक जागा भाजपाला मिळतील असे सांगण्यात आले आहे. तर शिवसनेला व अजित दादांच्या राष्ट्रवादीला सर्वाधिक फटका बसणार असल्याचे दिसतंय. राज्याच्या राजकारणात खळबळ उडविणारा सर्व्हे समोर आल्याने अनेकांच्या पायाखालची वाळू सरकलीय.
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणूक आयोगाने हरियाणा आणि जम्मू काश्मिरमधील निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यात. हरियाणात 1 ऑक्टोबरला मतदान होणार असून 4 ऑक्टोबरला निकाल जाहीर केला जाणार आहे. तर महाराष्ट्रात दिवाळीनंतर राजकीय फटाके फुटतील असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना तयारीसाठी आणखी दोन महिन्यांचा वेळ मिळालाय. दोन महिन्यानंतर होणार विधानसभा निवडणूक ही महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये होणार असल्याचे जवळपास निश्चित झालंय?
सध्या महाविकास आणि महायुतीच्या नेते मंडळींकडून विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालविलीय. महाविकास आघाडीच्यावतीने मुंबईत 16 ऑगस्ट रोजी मेळावा घेत विधानभा निवडणूक एकत्रितच लढविण्याचे संकेत दिलेत. तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती विरोधात वज्रमूठ आवळत महायुतीला सत्तेतून पायउतार करायचेच असा निश्चय केलाय. त्यासाठी उमेदवारी नाही मिळाली तरी चालेल पण महायुतीचा सुपडासाफ करु अशी शपथही घेतलीय. ज्यांचे आमदार ज्यादा त्या पक्षाचा मुख्यमंत्री नकोय तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करुनच निवडणुकीला सामोरे जावू असेही उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यात जाहीर केलेय. शरद पवारांनीही महाविकास आघाडीच्या नेते व कार्यकर्त्यांनी एकदिलाने, एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचा सल्ला दिलाय.
तर दुसरीकडे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणलीय. या योजनेला सध्या भरभरून प्रतिसाद मिळत आहे. पहिले दोन हप्तेही लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा केलेत. त्यामुळे महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित दादांनी सत्ता द्या योजना कायमस्वरुपी चालू ठेवतो असा वादा केलाय. सत्ता न दिल्यास योजना बंद होईल असा सुचक इशाराही दिलाय. तर महाविकास आघाडीकडून आमची सत्ता आल्यास महिलांना दीड हजार रुपये दिला जाणारा हप्ता वाढविण्यात येईल असे आश्वासन दिले जातेय. दोन्ही आघाड्यांकडून सध्या घोषणांचा पाऊस पडत आहे. असे असले तरी लाडकी बहिण योजनेचे पहिले दोन हप्त महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालीय हे मात्र वास्तव.
अशातच मॅट्रीस सर्व्हे एजन्सीने आणि टाइम्स नाऊने शुक्रवारी महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणा या तीन राज्यांमधील मतदारांचा ओपिनियन पोल जारी केला आहे. महाराष्ट्रातील ओपिनिय पोल हा राजकीय नेत्यांची झोप उडवणाराच आहे. विधानसभेच्या 288 जागांमध्ये महायुती आघाडीवर दिसतेय. तर महाविकास आघाडीही महायुतीपेक्षा कमी नाही, असेच चित्र दिसून येतेय.
सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणूक झाली तर भाजपला 95 ते 105 जागा मिळतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला 19 ते 24 जागा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 7 ते 12 जागा मिळतील. काँग्रेसला 42 ते 47 जागा, उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला 26 ते 31 जागा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 23 ते 28 जागा मिळतील. इतर पक्ष आणि उमेदवारांना 11 ते 16 जागा मिळतील असा अंदाज आहे.
मतांच्या सर्वेक्षणानुसार, भाजपला 25.8 टक्के, शिवसेनेला 14.2 टक्के आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 5.2 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 18.6 टक्के, शिवसेना ठाकरे गटाला 17.6, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 6.2 आणि इतरांना 12.4 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. या सर्व्हेमुळे राजकीय नेत्यांच्या झोपा उडाल्यात हे मात्र नक्की! हा सर्व्हेचा अंदाज असला तरी विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती यश मिळतेय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.