माय नगर वेब टीम
अहमदनगर – Ajit Pawar News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सोमवारी (दि.22) रोजी केलेला अहमदनगर जिल्ह्याचा दौरा महत्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यातून अजित दादांनी लाडकी बहिण योजनेचा शुभारंभ करत पारनेर, नगर, श्रीगोंदा व कर्जत तालुक्यात मतांची पेरणी केली असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, याच दौऱ्यातून लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या दिवशी दोन महिन्यांचा हप्ता आपल्या खात्यात जमा होणार असल्याची खूशखबरही देऊन टाकली आहे.
लोकसभा निवडणुकीपाठोपाठ आता विधानसभेची निवडणूक होणार आहे. विद्यमान आमदारांची मुदत नोव्हेंबर महिन्यामध्ये संपत आहे. त्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकी होऊ शकतात असा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्यातील नेते मंडळींकडून राज्यात दौरे केले जात आहेत.
नुकताच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अहमदनगर जिल्ह्याचा दौरा केला. त्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी अहमदनगर जिल्ह्याचा दौरा केला. शरद पवार यांच्या पाठोपाठ लगेचच अजित पवार यांनी केलेल्या दौऱ्यामुळे अजित पवार यांच्या दौऱ्याला विशेष महत्व आले आहे. अकोले दौऱ्यातून या मतदारसंघातून अमित भांगरे हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील यावर शिक्कामोर्तब केल्याचे बोलले जात आहे.
त्याच्यापाठोपाठ लगेचच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील पारनेर, नगर, श्रीगोंदा आणि कर्जतमध्ये लाडकी बहिण योजनेचा शुभारंभ करत मतांची साखर पेरणी केली. तसेच लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या दिवशी दोन महिन्यांचे दोन हप्ते दिले जाणार असल्याची खुशखबर दिली. त्यामुळे नगरमध्ये झालेल्या कार्यक्रमांमध्ये महिलांनी अजित पवार यांचे जोरदार स्वागत केले.
लाडकी बहिण योजना यापुढेही चालवायची असल्यास महायुतीच्या उमेदवारांसमोरील बटन विधानसभा निवडणुकीत दाबावे असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित महिलांना सभेत केले. तसेच महिलांशी अजित पवार यांनी संवाद साधला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पारनेर, नगर, श्रीगोंदा व कर्जत येथे लाडकी बहिण योजनेचा शुभारंभ केला.
शरद पवार अन अजित पवार यांचा जिल्ह्यातील सहा जागांवर दावा
गत विधानसभा निवडणुकीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील सहा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले. परंतू, दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीमध्ये झालेल्या फाटाफुटीत अजित पवार यांच्यासोबत चार तर दोन आमदार शरद पवार यांच्यासोबत होते. लोकसभा निवडणुकीत नीलेश लंके यांनी अजित पवार यांची साथ सोडत शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. आता अजित पवार यांच्याकडे आ. संग्राम जगताप, अशुतोष काळे, डॉ. किरण लहामटे आहेत. तर आ. रोहित पवार, प्राजक्त तनपुरे आणि खा. नीलेश लंके हे शरद पवार यांच्या सोबत आहेत. शरद पवार यांच्या गटानेही जिल्ह्यातील सहा जागांवर दावा सांगितला आहे. तसेच अजित पवार गटातील नेत्यांनीही राष्ट्रवादीच्या ताब्यातील सहा जागांवर दावा सांगितला आहे. दोन्ही राष्ट्रवादीकडून पारनेर, नगर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड, अकोले, राहुरी, कोपरगाव या मतदारसंघांवर दावा सांगितला आहे.