माय नगर वेब टीम
रिलायन्स पॉवर लिमिटेडची (रिलायन्स पॉवर) उपकंपनी असलेल्या रिलायन्स एनयू सनटेक प्रायव्हेट लिमिटेडला (रिलायन्स एनयू सनटेक) भारतातील सर्वात मोठा सौर आणि बॅटरी स्टोरेज प्रकल्पाचा लेटर ऑफ अर्वाड मिळाले आहे. या प्रकल्पात ९३० मेगावॅट क्षमतेच्या प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्प आणि ४६५ मेगावॅट/१८६० मेगावॅटवर क्षमतेच्या बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टमचा समावेश आहे. (बीईएसएस अर्थात बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली), भारतीय सौरऊर्जा महामंडळाकडून (एसईसीआय) कंपनीला लेटर ऑफ अवॉर्ड (एलओए) प्राप्त झाले आहे. हा प्रकल्प प्राप्त झाल्याने अनिल अंबांनींच्या कंपनीला मिळालेले हे मोठे यश आहे.
या प्रकल्पात ग्रिड स्टोरेज बॅटरी स्थापित केल्या जाणार असून, भारतातीलच नव्हे, तर चीन वगळता उर्वरित आशियामधील एका ठिकाणी केली जाणारी ही सर्वांत मोठी स्थापना असेल. दिवसातील ४ तास विजेचा पूर्णक्षमतेने खात्रीशीर तसेच स्पर्धात्मक दराने पुरवठा झाल्यास डिसकॉम्ससाठी (वीज पुरवठा करणारी खाजगी वितरण कंपनी) तो मोठा दिलासा ठरणार आहे. सध्या डिसकॉम्सना वीजवापर पूर्ण भरात असलेल्या तासांमध्ये ऊर्जा विनिमय केंद्रांकडून १० रुपये प्रति एककापर्यंत दराने सातत्याने वीजखरेदी करावी लागत आहे.
रिलायन्स एनयू सनटेकने, ९ डिसेंबर २०२४ रोजी घेतल्या गेलेल्या ई-रिव्हर्स लिलावामध्ये, भारतीय सौरऊर्जा महामंडळाकडून (एसईसीआय) बॅटरी ऊर्जा साठवण प्रणालीसह (बीईएसएस) ९३० मेगावॅट क्षमतेचा महत्त्वपूर्ण सौरऊर्जा प्रकल्प, यशस्वीरित्या प्राप्त केला.
निविदेतील अटींनुसार, रिलायन्स एनयू सनटेक सौरऊर्जेद्वारे भारित केली जाणारी ४६५ मेगावॅट/१,८६० मेगावॅटअवर किमान क्षमतेची साठवण प्रणालीही स्थापित करणार आहे.आंतरराज्यीय पारेषण प्रणालीतील (आयएसटीएस) एकूण २,००० मेगावॅट क्षमतेचे संलग्न सौरऊर्जा प्रकल्प व त्यासह १,००० मेगावॅट/४,००० मेगावॅटअवर क्षमतेच्या ऊर्जा साठवण प्रणालींसाठी पाच कंपन्या प्रयत्न करत होत्या. त्यात भारतातील आघाडीच्या वीजनिर्मिती कंपन्यांपैकी एक असलेल्या रिलायन्स एनयू सनटेक कंपनीने सर्वाधिक वैयक्तिक वितरण (इंडिव्हिज्युअल अलोकेशन) प्राप्त केले.
सौरऊर्जा हा किफायतशीर पर्याय कंपनीने विकसित केला
बीईएसएसने भारतात सौरऊर्जेच्या क्षेत्रात केलेली तंत्रज्ञानात्मक प्रगती रिलायन्स एनयू सनटेकच्या या यशामुळे अधोरेखित झाली आहे. नवीनीकरणीय ऊर्जेच्या पर्यायांमध्ये सौरऊर्जा हा किफायतशीर पर्याय कंपनीने विकसित केला आहे. दररोज सर्वाधिक वीजवापराच्या काळात चार तास वीजपुरवठ्याची (किंवा चार तासांचा डिस्चार्ज कालावधी) हमी या प्रकल्पामुळे मिळणार आहे.एसईसीआय रिलायन्स एनयू सनटेकशी २५ वर्षांच्या कालावधीसाठी वीजखरेदी करार (पीपीए) करणार आहे आणि ही खरेदी केलेली वीज भारतातील अनेकविध डिसकॉम्सना विकली जाणार आहे. रिलायन्स एनयू सनटेक या प्रकल्पाचा विकास बिल्ड-ओन-ऑपरेट (बांधा-मालकी घ्या-चालवा) या तत्त्वावर करणार आहे.