Ahmednagar Politics : श्रीगोंद्यात बडा नेता विधानसभेच्या आखाड्यात; बहुरंगी लढतीमुळे चुरस वाढणार….

माय नगर वेब टीम
Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीपाठोपाठ राज्यात आता विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली असून अनेक इच्छुकांनी आपापल्या सोयीच्या मतदारसंघात चाचपणी सुरु केली आहे. तसेच आपण लढण्यास तयार असल्याचेही इच्छुकांनी नेते मंडळींच्या निदर्शनास आणून देण्याचे काम विविध माध्यमातून केले आहे. तर काहींनी मात्र वरिष्ठ नेत्यांचा शब्द घेत विधानसभा निवडणुकीच्या प्रचारालाच सुरुवात केली आहे. जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्या घोषणेमुळे श्रीगोंदा विधानसभा निवडणूक बहुरंगी होणार हे आता दिसू लागले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती विरोधात महाविकास आघाडी अशाच लढती रंगणात असण्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. त्यानुसान महायुती व महाविकास आघाडीच्या नेते मंडळींकडून मतदारसंघांची चाचपणी सुरु आहे. जागा वाटपाचा अद्यापही घोळ सुरुच आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मतदारसंघात प्राबल्य असलेल्या नेत्यांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

श्रीगोंदा मतदारसंघात सध्या भाजपाचे बबनराव पाचपुते हे आमदार आहेत. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला राहिल्यास येथे आमदार बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव विक्रम पाचपुते किंवा आमदारांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांचा विचार केला जाऊ शकतो. तर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी तयारीत आहेत. काँग्रेसकडून घनश्याम शेलार तयारीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून माजी आमदार राहुल जगताप इच्छुक आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून उपनेते साजन पाचपुते यांनी तयारी सुरु केली आहे. तसेच नुकतीच श्रीगोंद्यात पत्रकार परिषद घेत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेत कोणत्याही परिस्थितीत आपण निवडणूक लढवणार असल्याचे संदेश दिला आहे.

श्रीगोंद्यावर शिवाजी कर्डिलेंची नजर
लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे सुरु झाले आहे. महाविकास आघाडी व महायुतीत कोणता मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जातो याचा अंदाज बांधन इच्छुकांनी नेतेमंडळींच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. तर काहींनी नेत्यांचा आशिर्वाद घेत निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. राहुरी आणि श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ महायुतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जाणार असल्याची असल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार अनेकांनी गाठीभेटी घेतल्या आहेत. दरम्यान, मतदारसंघाचा अंदाज बांधत भाजपा नेत्ो, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनीही राहुरीबरोबरच श्रीगोंदा मतदारसंघावर दावा सांगितला असल्याचे बोलले जाते. त्याअनुषंगाने कर्डिले यांनी अजितदादांची भेटही घेतली असल्याची वार्ता आहे. तशी चाचपणीही त्यांच्या यंत्रणेकडून सुरु असल्याचे सांगण्यात येते. श्रीगोंदा मतदारसंघावर नजर ठेवून असलेले भाजपाचे नेते शिवाजी कर्डिले राहुरीत लढतात की श्रीगोंद्यात डाव टाकतात हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

सर्व नेत्यांना मी मदत केली आता त्यांची जबाबदारी
यापूर्वी विधानसभा निवडणुकीमध्ये आ. बबनराव पाचपुते यांना नेते मानून अनेक वेळा मदत केली. स्व. शिवाजीराव नागवडे यांना साखर कारखान्याच्या निवडणुकीत मदत केली. स्व. नागवडे यांच्या स्नुषा सौ. अनुराधाताई नागवडे यांच्यासाठी जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष असताना तसेच विद्यमान जिल्हा परिषद सदस्य असताना थांबलो आणि त्यांना जिल्हा परिषद सदस्य केले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार राहुलदादा जगताप यांना विधानसभेत पाठविण्यासाठी मदत केली. मागील विधानसभा निवडणुकीत घनःश्याम शेलारांना मदत केली. सर्व नेत्यांना मी मदत केली आहे. आता त्यांच्यावर मदत करण्याची जबाबदारी आहे. शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते, बाळासाहेब नाहाटा, दत्तात्रय पानसरे हे माझे मित्र आहेत. माझ्या राजकीय जीवनातील शेवटची निवडणूक लढणार आहे. पुन्हा कोणतीच निवडणूक लढणार नसल्याचे अण्णासाहेब शेलार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. श्रीगोंदा मतदारसंघातील बरेच प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

साजन पाचपुते यांच्या नावाची घोषणा
दरम्यान, श्रीगोंद्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते साजन पाचपुते यांच्या संपर्क कार्यालयाचे खासदार संजय राऊत यांच्या हस्ते उद्घाघन झाले. यावेळी खा. राऊत यांनी श्रीगोंद्यातून उपनेते साजन पाचपुते यांची उमेद्वारीच एक प्रकारे जाहीर करुन टाकली. तसेच साजन पाचपुते यांच्याबरोबरच पारनेर मतदारसंघातून राणीताई लंके याच उमेदवार असतील असेही सांगितले. राऊत यांच्या घोषणेमुळे श्रीगोंदा मतदारसंघ महाविकास आघाडीत शिवसेनेच्या वाट्याला गेला असल्याच्या चर्चेत आता जोर धरला आहे.