लाडक्या बहिणीचे घेतले पैसे परत; राजकारण पेटलं

माय नगर वेब टीम
मुंबई – महायुतीला सत्तेपर्यंत पोहोचवणाऱ्या लाडक्या बहीणीवर आता अपात्रतेची टांगती तलवार आहे. तर लाडकीचे पैसे परत घेण्याची चर्चा रंगलीय… त्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय.. नेमकं लाडकीवर अपात्रतेची टांगती तलवार का आहे? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. लाडकी बहीण योजनेचा कौतूक सोहळा संपल्यानंतर आता सरकारने निकषांची भाषा सुरू केलीय.

एवढंच नाही तर धुळ्याच्या लाडक्या बहीणीच्या खात्यातील 5 हप्त्यांचे साडे सात हजार रुपये सरकारनेच काढून घेतल्याचं समोर आलंय. त्यामुळे सत्ता स्थापनेनंतर लाडकी बहीण दोडकी झाल्याची चर्चा रंगलीय. तर सत्ता आल्यानंतरच निकषावर बोट कसं ठेवता? असा सवाल करत विरोधी पक्षाने लाडकी बहीण योजनेची श्वेत पत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणी केलीय.

सत्ता स्थापनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही निकषांवर बोट ठेवलं होतं. तर महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी तर थेट कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र ठरणार त्याची यादीच वाचून दाखवली. त्यामुळे लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.. मात्र अपात्रतेसाठी कोणते निकष आहेत? पाहूयात.

लाडकीच्या अपात्रतेचे निकष
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त
कुटुंबात कुणाच्या नावावरही चारचाकी वाहन नको
शासकीय नोकरीत असताना योजनेचा लाभ घेतल्यास अपात्र
इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असल्यास अपात्र ठरणार
लग्नानंतर परराज्यात स्थलांतर झालेल्या महिलांनाही लाभ नाही
राज्यभरातून 2 कोटी 63 लाख लाडक्या बहीणींनी अर्ज दाखल केले होते.. त्यापैकी 2 कोटी 47 लाख अर्ज पात्र ठरलेत.. मात्र आता नव्याने छाननी सुरु झाल्याने अपात्र ठरणाऱ्या लाडक्या बहीणींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.. त्यामुळे निकषांबाहेर लाभ घेतलेल्या किती लाडक्या बहीणी अपात्र ठरणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे..