अखेर सुरेश धस यांनी विषय संपवला; प्राजक्ता माळीची माफी, म्हणाले…

माय नगर वेब टीम
मुंबई – Suresh Dhas Apology to Prajakta Mali: भाजपा आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेतलं होतं. यानंतर तिला सोशल मीडियावर (Social Media) ट्रोलिंगचा सामना करावा लागला. याप्रकरणी पत्रकार परिषद घेत तिने आपला संताप व्यक्त केला होता. तसंच महिला आयोग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दिली होती. सुरेश धस यांनी आज दुपारी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्यासाठी विषय संपला असल्याचं म्हटलं होतं. पण अखेर त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त केली आहे.

सुरेश धस यांची दिलगिरी
“प्राजक्ता माळीबाबत मी केलेल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. मला त्यांचा अपमान करायचा नव्हता. मी त्यांच्या चारित्र्यावर बोलण्याचा विषयच नव्हता. मी प्राजक्ता माळीसह सर्व स्त्रियांबद्दल आदर बाळगतो. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ निघाल्याने त्यांचं किंवा कोणत्याही महिलेचं मन दुखावलं असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो,” असं सुरेश धस म्हणाले आहेत.

याआधी दुपारी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर सुरेश धस यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी प्राजक्ता माळीसंबंधी विचारण्यात आलं होतं. यावेळी ते म्हणाले होते की, “प्राजक्ता माळीचा विषय संपला. कृपया तुम्ही तो विषय बोलणार असाल तर बोलू नका. जे काही झालेलं आहे त्याला मी सामोरे जायला तयार आहे. आणि मला वाटतं माझी बाजू अनेकांनी तिथे मांडली.”

सुरेश धस काय म्हणाले होते?
बीड जिल्ह्यात ‘आकां’ची 100 ते 150 एकर जमीन आहे. त्यांनी आपल्या जमिनीत 30 ते 40 कोटी रुपयांचे बंधारे बांधून घेतले आहेत. ‘आकां’कडे पाच वर्षात एवढा पैसा आला कुठून? आम्ही परळीत बघत असतो असं सांगत त्यांनी दोन अभिनेत्रींचं नाव घेतलं होतं. पुढे ते म्हणाले होते, “ज्यांना इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सचं शिक्षण घ्यायचं असेल त्यांनी परळीत यावे. प्राजक्ता माळीही (Prajakta Mali) आमच्याकडे येत असतात. त्यांचा अतिशय जवळचा पत्ता सापडायचा असेल तर आमचा परळी पॅटर्न बघितला पाहिजे”.

महिला आयोगाने घेतली दखल
प्राजक्ता माळी यांनी यानंतर महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. महिला आयोगाने याप्रकरणी मुंबई पोलिसांना निर्देश दिले होते. “अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची तक्रार आयोग कार्यालयास प्राप्त झाली आहे. त्याचा अभ्यास करून, कायदेशीर बाबी तपासून आवश्यक ती कार्यवाही नियमानुसार आयोग करेल,” असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितलं होतं.

एक्सवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये महिला आयोगाने लिहिलं होतं की, “महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयाला प्राजक्ता माळी यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. बीड जिल्ह्यातील आमदार श्री सुरेश धस यांनी श्रीमती माळी यांच्याबद्दल केलेले कथित अयोग्य, अवमानकारक व बदनामीकारक विधान तसेच त्यांनंतर सोशल मीडियावर प्रसिद्ध होत असलेल्या बदनामीकारक बातम्या यामुळे त्यांच्या वैयक्तिक व सामाजिक जीवनावर त्याचे परिणाम होत असल्याचे त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे”.

“सदर प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचे असून महिलेच्या प्रतिष्ठेस बाधा पोहोचवणारे असल्याने राज्य महिला आयोगाने मुंबई पोलीस आयुक्त यांना याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले असून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे”, असे महिला आयोगाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

खपवून घेणार नाही – देवेंद्र फडणवीस
प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतली होती आणि निवेदन दिलं होतं. यावेली देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सन्मानाला बाधा येईल, असं कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल, असं स्पष्ट केलं होतं.