लाडक्या बहिणीसाठी खुशखबर; ‘या’ बॅंकेत शून्य रुपयात खाते उघडणार

 

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

माय नगर वेब टीम
अहमदनगर: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेअंतर्गत महिला भगीनींना रुपये १५००/- महिना अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली असून, या अंतर्गत योजनेमधील महिलांकरिता अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शून्य रुपयात बँक खाते उघडून देणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत महिला भगीणीकडून शासनाने दिनांक १ जुलै २०२४ पासून फॉर्म भरण्यास सुरुवात केली असून, यामध्ये बँकेचे खाते असणे आवश्यक असल्याने बँक खाते अभावी महिलांचे नुकसान होवू नये व खाते उघडताना आर्थिक भुर्दंड पडू नये यासाठी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने हा निर्णय घेतला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, व्हा. चेअरमन अँड. माधवराव कानवडे व संचालक मंडळ यांनी दिली.

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विस्तार कक्षासह एकूण २९८ शाखांचे जिल्हयात मोठे जाळे असून प्रामुख्याने ग्रामीण भागात बँक सर्व खातेदारांना सेवा देत असते. महिलांना आपल्या जवळच्या जिल्हा बँक शाखेत झीरो बॅलन्स (शून्य शिल्लक रक्कम) खाती बँकेच्या सर्व शाखांमध्ये तात्काळ खाते उघडून घेण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. खाते उघडण्यासाठी महिला भगीनींनी खाते उघडण्याचे फॉर्म, दोन फोटो, आधार कार्ड झेरॉक्स इ. आवश्यक कागदपत्राची केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे तरी या योजनेचा महिलांनी लाभ घ्यावा असे आवहान श्री. कर्डिले यांनी केले.