माय नगर वेब टीम
केज : सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही दुर्दैवी घटना असून या प्रकरणात दोषी असणाऱ्यांची कोणाचीही राज्य शासन गय करणार नाही. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होण्यासाठी राज्य शासन लक्ष ठेवून आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून यांचा सुत्रधार (मास्टरमाईंड) कोणीही असो त्या शोधून काढणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता.२१) मस्साजोग येथे बोलताना सांगितले.
तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर कुटुंबियांची भेट घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी मस्साजोग येथे आले होते. यावेळी त्यांच्यासोबत आमदार विक्रम काळे, रमेश आडसकर योगेश क्षीरसागर व सावता परिषदेचे कल्याण आखाडे उपस्थित होते.
मस्साजोग येथे दाखल होताच अजित पवार यांनी देशमुख कुटुंबीयांची घेऊन आस्थेवाईकपणे चौकशी करून सांत्वन केले. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, संतोष देशमुख हत्या प्रकरणाची राज्य शासनाकडून वरिष्ठ पोलीस अधिकारी व न्यायाधिशांमार्फत कसून चौकशी केली जात आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
यात कोणाचीही गया केली जाणार नाही, त्याबरोबर या घटनेचा सुत्रधार कोणीही असो त्याला सोडणार नाही. देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी राज्य शासन मी स्वतः आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात बीड जिल्ह्यात चालणारी गुंडगिरी व दहशत मोडीत काढण्यासाठी या गुन्ह्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वाशित केले आहे. त्यामुळे देशमुख कुटुंबायांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी…
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने व निःपक्षपातीपणे होण्यासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन त्यांची राज्याच्या मंत्रीमंडळातून हाकालपट्टी करण्याची मागणी मस्साजोग ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.