माय नगर वेब टीम
मुंबई – जगभरात २०२० साली थैमान घातलेल्या कोरोना महामारीनंतर चीन आणखीन एका धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडलाय. ह्युमन मेटाप्युमोव्हायरस वेगानं पसरत असून, भारतात याचे ३ रूग्ण आढळले आहेत. कर्नाटकात सुरूवातीला २ जणांना एचएमपीवी व्हायरसची लागण झाली होती. नंतर गुजरातमध्ये २ वर्षाच्या चिमुकल्याला एचएमपीवी व्हायरसची लागण झाल्याची माहिती आहे. देशात या व्हायरसनं एन्ट्री केल्यानं महाराष्ट्रातील नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या व्हायरससंदर्भात नागरिकांनी घाबरू नये, असं आवाहन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलंय.
एचएमपीवी व्हायरसंदर्भात नागरिकांनी घाबरू नये, राज्य सरकार आणि राज्याचा आरोग्य विभाग येणार्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सक्षम आहे. असं आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर म्हणाले आहेत. तसेच, केंद्र सरकारच्या वतीनं राज्य सरकार आणि आरोग्य विभागाला गाईडलाईन्स जारी करण्यात येईल. तसेच जनतेनं खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन देखील आरोग्यमंत्री आबिटकर यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री आणि आरोग्य विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. गुजरात आणि कर्नाटकात एचएमपीवीग्रस्त रूग्ण सापडले असल्याची माहिती आहे. पण महाराष्ट्रात एकही रूग्ण आढळले नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मुख्यमंत्री आणि आरोग्य विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्यामुळे राज्यातील जनतेनं अफावांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन आरोग्यमंत्री यांनी दिले आहेत.
एचएमपीवी या व्हायरसबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यातील जनतेला चिंता करू नये असं म्हटलं आहे. ‘प्राथमिक माहितीनुसार हा व्हायरस नवीन नाही, यापूर्वी देखील हा व्हायरस आलेला होता. या व्हायरससंदर्भात जे काही मार्गदर्शक सूचना आहेत, त्या लवकरच जारी करू. केंद्र सरकारचं आरोग्य मंत्रालय सर्व राज्यांसोबत बैठक घेणार आहेत. लगेच सर्वांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत.