माय नगर वेब टीम
मुंबई – मंत्रीपद न मिळाल्यानं छगन भुजबळ नुसते नाराज नाही तर संतापलेत. नाशिकमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावाही घेतला. त्यांचा रोख अजित पवारांच्या दिशेने आहे. यावेळी समर्थकांनी भुजबळांनी भाजपात प्रवेश करावा असा आग्रह धरलाय. त्यामुळे भुजबळांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
महायुती सरकार बहुमतानं सत्तेत आलं. मात्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीत नाराजीचं पेव फुटलं. यात नाराज असलेले अजितदादांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी तर थेट नेतृत्वाविरोधात उघ़डपणे दंड थोपटले आहेत. विशेष म्हणजे आपल्या मंत्रिपदासाठी फडणवीसही आग्रही होते असं सांगत भुजबळांना भाजपबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण झालाय. की काय अशी चर्चा सुरू झालीय.
त्यात आणखी नाशिकच्या मेळ्याव्याची भर पडलीय. कारण सलग तिसऱ्या दिवशी नाराज भुजबळांनी आपलं होम ग्राऊंड असलेल्या नाशिकमध्ये कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित केले यात त्यांच्या कार्य़कर्त्यांनी थेट त्यांना भाजपात जाण्याची गळ घातली. नाराज असलेल्या भुजबळांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर उघ़ड पणे निशाणा साधल्यामुळे आता पक्षांतर्गत हालचालींना वेग आलाय. भुजबळांशी चर्चा करून यावर तोडगा काढला जाईल अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी दिलीय.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जरांगे विरुद्ध भुजबळ असा सामना रंगला होता. मराठा-ओबीसी असं उघड संघर्ष पहायला मिळाला. भुजबळांनी ओबीसी मेळावे घेत जरांगेंना जशास तसं प्रत्युत्तर दिलंय होतं. मात्र सत्ता मिळाल्यानंतरही भुजबळांसारख्या हेवी वेट नेत्याला डावलण्यामागे अजित पवारांचं काय गणित आहे? हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र या नाराजीतून नवीन वर्षात भुजबळ राजकीय ट्रॅक बदलणार की त्यांच्याकडे दुसरी कोणती तरी मोठी जबाबदारी देणार याची उत्सुकता आहे.