माय नगर वेब टीम
अहिल्यानगर – चितळे रोडवरील नेहरू मार्केटची मोकळी जागा अतिक्रमणमुक्त करून भाजीविक्रेत्यांना बसण्यासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी अहिल्यनगर हॉकर्स युनियचे अध्यक्ष माजी नगरसेवक संजय झिंजे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
शहरात अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात येत आहे. चितळे रोडवरील ऐतिहासिक नेहरू मार्केटची इमारत १३ वर्षांपूर्वी नवीन मोठे संकुल बांधण्यासाठी भुईसपाट करण्यात आली. आज तेरा वर्षानंतरही येथे काहीच झाले नाही. मनपाच्या मालकीची ही मोकळी जागा ना गाळेधारक भाजीविक्रेत्यांच्या उपयोगाची राहिली ना महापालिकेच्या कामाची राहिली. याठिकाणी सध्या अनेक अतिक्रमणे झाली आहेत. टपऱ्या टाकण्यात आल्यात. अनेक जण येथे कचरा आणून टाकतात. लघुशंका करण्यासाठी याच जागेचा उपयोग केला जातो. तसेच अनेकांच्या खाजगी चारचाकी, दुचाकी येथे पार्क केलेल्या असतात. संपूर्ण जागाच अतिक्रमणांनी गिळंकृत केली आहे. मनपाच्या कोट्यवधी रुपये किंमतीच्या जागेचा चुकीच्या पध्दतीने वापर होत आहे.
अतिक्रमण विरोधी पथक चितळे रोडवरील भाजी विक्रेत्यांवर कारवाई करीत आहे. वास्तविक एवढी मोठी मोकळी जागा असताना त्यांना नाईलाजाने रस्त्यावर बसावे लागत आहे. मनपाने या जागेवर पे अॅण्ड पार्क न करता ती जागा अतिक्रमण मुक्त करून दिल्यास भाजी विक्रेते तिथे बसण्यास तयार आहेत. त्यामुळे रस्ताही मोकळा होईल व वाहतुकीला अडथळाही होणार नाही. या जागेची व्यवस्थित साफसफाई करून सार्वजनिक स्वच्छतागृह बांधून द्यावे. तसेच चारही बाजूंनी संरक्षक भिंत बांधून दिल्यास भाजी, फळ विक्रेत्यांचा मालही सुरक्षित राहिल. तसेच याठिकाणी लाईटचीही व्यवस्था करावी, असे निवेदनात म्हटले आहे.