माय नगर वेब टीम
अहिल्यानगर ः अहमदनगर पत्रकार संघातर्फे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोमवारी (दि. 6) रोजी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. स्टेशन रस्त्यावरील राजयोग हॉटेलमध्ये सकाळी साडेनऊ कार्यक्रम होणार असून, उत्कृष्ट कामगिरी करणार्या पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल लगड व सचिव संदीप रोडे यांनी दिली.
अहमदनगर पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी पत्रकार दिनाच्या दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, जिल्हा माहिती अधिकारी किरण मोघे आदी उपस्थित राहणार आहेत.
पत्रकारितेत गेल्या वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी करणार्या विविध दैनिकांच्या पत्रकार बांधवांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी अहमदनगर पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच शहरातील सर्व दैनिकांचे पत्रकार, छायाचित्रकार, मुक्त पत्रकार बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पत्रकार संघातर्फे करण्यात आले आहे.