Rahul Gandhi: राहुल गांधींवर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप, पोलिसात तक्रार दाखल

माय नगर वेब टीम
भाजपने विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सकाळी संसदेच्या परिसरात काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली होती. याप्रकरणी भाजपने राहुल गांधींवर हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला असून दिल्ली पोलीस त्यांच्याविरोधात तक्रार देखील दाखल केलीय.

भारतीय न्यायिक संहितेच्या कलम १०९, ११५, ११७, १२५, १३१ आणि ३५१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. अमित शहा यांनी आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात गुरुवारी सकाळी काँग्रेसने संसदेत निदर्शने करत होती. भाजप खासदारही काँग्रेस विरोधात आंदोलन करत होते. त्यावेळी काँग्रेस आणि भाजपचे खासदार समोरासमोर आले. यावेळी प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत जखमी झाले. राहुल गांधी यांनी त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजपने केलाय.

संसदेत तक्रार दाखल केल्यानंतर भाजप खासदार अनुराग ठाकूर म्हणाले की, आम्ही राहुल गांधींविरोधात दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केलीय. त्यांच्यावर शारीरिक हल्ला आणि चिथावणी दिल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आलीय. एनडीएचे खासदार शांतपणे काँग्रेसच्या खोट्या प्रचाराचा पर्दाफाश करत होते, त्याचवेळी राहुल गांधींनी त्यांच्या आघाडीच्या खासदारांसह त्या दिशेने आले असं ठाकूर म्हणालेत. राहुल गांधींना सुरक्षा रक्षक दुसऱ्या मार्गाने जाण्यास सांगत होते, परंतु त्यांनी ऐकलं नाही. ते गैरवर्तन करत होते.

स्वत:ला कायद्याच्या वर समजण्याची सवय या कुटुंबाला लागलीय असंही ठाकूर म्हणालेत. राहुल गांधींनी आपल्या पक्षासह मोर्चा काढला. त्यावेळी ते एनडीएच्या खासदारांवर चालून आले. त्यांना भडकवले. खासदारांना दुखापत होऊ शकते हे त्यांना माहीत होते तरीही त्यांनी तेच केले. मुकेश राजपूत यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. प्रताप सारंगी यांचेही डोके फुटले आहे. आम्ही राहुल गांधींविरोधात कलम १०९, ११५, ११७, १२५, १३१ आणि ३५१ अंतर्गत तक्रार दाखल केलीय. दरम्यान कलम १०९ हत्येचा प्रयत्न यासाठी लावला जातो. यावरून राहुल गांधी यांनी जाणूनबुजून मार्ग बदलला. सहकारी खासदारांना भडकावले, त्यामुळे दोन खासदारांना गंभीर दुखापत झालीय.

दरम्यान तक्रार देण्यासाठी गेलेले भाजप खासदार बन्सुरी स्वराज म्हणाल्या, ही वृत्ती केवळ अशोभनीयच नाही तर गुन्हेगारीची आहे आणि त्यामुळेच आज आम्ही सर्वजण पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दाखल केली. सुरक्षा दलांनी राहुल गांधींना वारंवार विनंती केली होती की, तुमच्यासाठी एक पर्यायी मार्ग तयार करण्यात आलाय. ज्याद्वारे तुम्ही अत्यंत शांततेत संसदेत प्रवेश करू शकता, परंतु राहुलने ती विनंती फेटाळून लावली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.