विधानसभेला राजळेंचा पत्ता कट!;ढाकणेंना शब्द…घुलें बंधूंचे काय?

 

मुंडेंचा शेवगाव-पाथर्डीवर डोळा / हर्षदा काकडे ठरणार डोकेदुखी
माय नगर वेब टीम
पाथर्डी – पाथर्डी-शेवगाव मतदारसंघातील निवडणूक ही नेहमीच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याभोवती फिरते. त्याला कारणही तसेच आहे. मुंडे नेहमी म्हणायचे परळी माझी आहे तर पाथर्डी माझी मावशी. त्यामुळे पाथर्डीकरांनी नेहमीच मुंडे घराण्याच्या पाठिशी राहणे पसंत केल्याचा आजवरचा इतिहास आहे. पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपाकडून आमदार करत त्यांचे पुर्नवसन करण्यात आले आहे. असे असले तरी मंत्री धनंजय मुंडे व पंकजा मुंडेही महायुतीत असल्याने परळीच्या जागेवर धनंजय मुंडेच लढतील असा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे पंकजा किंवा प्रितम मुंडे यांना पाथर्डी-शेवगाव मतदारसंघातून विधानसभा लढवावी लागेल असा अंदाज राजकीय वर्तुळात बांधला जात आहे. त्यामुळे आमदार मोनिका राजळे यांचा पत्ता कटण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. तर महाविकास आघाडीकडून प्रताप ढाकणे, चंद्रशेखर घुले कि हर्षदा काकडे उभ्या ठाकणार हे पाहणे महत्वाचे आहे.

शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघावर मराठा व वंजारी समाजाचे प्राबल्य आहे. वंजारी समाजावर ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा पगडा आहे. मतदारसंघाचे राजकारण आमदार मोनिका राजळे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, प्रताप काका ढाकणे, हर्षदा काकडे यांच्या भोवतीच फिरते. शेवगाव तालुक्यात घुले यांचे एकहाती तर पाथर्डी तालुक्यात राजळे व ढाकणे यांचे वर्चस्व आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. तर अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला. शेवगाव-पाथर्डीतून विखेंना मताधिक्य मिळाले परंतू, गत वेळी पेक्षा तब्बल 15 हजारांनी घटले. सध्या मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभारल्याने मराठा आरक्षणाचा फटका पंकजा मुंडे व सुजय विखे पाटील यांना मोठ्या प्रमाणात बसला असल्याचे बोलले जाते.

गत विधानसभा निवडणुकीतही पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. आताही लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. मंत्री धनंजय मुंडे व पंकजा मुंडे या सध्या महायुतीत आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे हे परळीतून विधानसभा लढवतील हे निश्चित मानले जाते. त्यामुळे पंकजा किंवा प्रितम मुंडे यांना विधानसभा लढवायचीच झाल्यास त्यांना वंजारी समाजाचे प्राबल्य असलेल्या शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागेल असा कयास बांधला जात आहे. मुंडे घराण्याचे शेवगाव-पाथर्डी कडे आपला मोर्चा वळविल्यास आमदार मोनिका राजळे यांचा पत्ता आपोआप कट होईल. मोनिका राजळे या येथील दोन टर्मच्या आमदार आहेत. राजळे यांच्या विजयात मुंडे कुटुंबियांचा मोलाचा वाटा आहे. परंतू, सध्या त्यांच्याबद्दल मतदारसंघात मोठी नाराजी आहे.

शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून मुंडेंची कन्या विधानसभेच्या रिंगणात उतरतील असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तविला जात आहे. असे झाले तर आमदार मोनिका राजळे या मुंडेंच्या कन्येला साथ देतील की अन्य पर्याय निवडतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याच बरोबर शेवगामध्ये प्राबल्य असलेले आणि माजी आमदार असलेले चंद्रशेखर घुले यांनीही तयारी चालविली आहे. हर्षदा काकडेही निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. तर प्रताप काका ढाकणे यांनीही विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदारसंघात मशागत केली आहे.

आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांच्यासाठी ढाकणे यांनी मोठी जबाबदार पार पाडली. त्यामुळे लंकेही विधानसभा निवडणुकीत ढाकणेंच्या विजयासाठी जिवाचे रान करतील असे बोलले जाते. ढाकणे यांना विधानसभेत पाठवायचेच असल्याचे सांगत ढाकणेंच्या समर्थकांमध्ये हवा भरण्याचे काम केले आहे. तर दुसरीकडे निवडणूक लढविण्यासाठी तयारीत असलेले माजी आमदार आमदार चंद्रशेखर घुले यांनीही कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपणही निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचा संदेश दिला आहे. जिल्हा परिषदेच्या सदस्या हर्षदा काकडे यांचीही ताकद मतदारसंघात मोठी आहे. त्यामुळे त्यांनीही विधानसभेवर दावा ठोकला आहे. शेवगाव पाथडी मतदारसंघातून महायुतीकडून मुडें विधानसभेच्या रिंगणात उतरल्यास महाविकास आघाडीकडून प्रताप काका ढाकणे हे रिंगणात असू शकतात. घुले, काकडे यांना अपक्ष रिंगणात उतरावे लागेल. त्यामुळे तीरंगी चौरंगी होणाऱ्या लढतीत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.