संतोष देशमुख हत्या; तपासातून धक्कादायक माहिती आली समोर

माय नगर वेब टीम
बीड : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. संतोष देशुमखांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. सरपंचांची करण्यात आलेली हत्या साधी नव्हती, मयत सरपंच संतोष देशमुख यांचे लायटरने डोळे जाळले, संपूर्ण पाठ काळीनिळी झाली होती. शेवटला जीव जात नव्हता म्हणून त्यांच्या छातीवर उड्या मारण्यात आल्या होत्या. त्यांची अवस्था बघून कोणालाही असे मरण येऊ नये असेच म्हणावे लागेल.

संतोष देशमुखांची हत्या करताना कोणती शस्त्रे वापरली?
सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ एसआयटीने रिकव्हर केले. तसेच न्यायालयाला संतोष देशमुखांच्या हत्या करताना कोणती शस्त्रे वापरली याची देखील माहिती देण्यात आली आहे. या हत्येमध्ये आरोपींनी मारहाण करताना 41 इंचाचा एक गॅसचा पाईप ज्याची एक बाजू काळ्या करदोड्याने मूठ तयार केली होती. लोखंडी तारेचे 5 क्लच वायर बसवलेली एक गोलाकार मूठ, एक लाकडी दांडा, तलवारीसारखं शस्त्र , चार लोखंडी रॉड आणि एक कोयता तसेत लोखंडी फायटर आणि धारधार कत्ती ही शस्त्रे वापरली होती.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात तीन आरोपींना 18 जानेवारीपर्यंच पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जयराम चाटे, प्रतिक घुले आणि महेश केदारला 12 दिवसांची सीआयडी पोलीस कोठडी देण्यात आली आहे. विष्णू चाटे , सुदर्शन घुले , सुधीर सांगळेला अटक करण्यात आली आहे. तसेच खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडलादेखील अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरु आहे.

नेमके काय आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण?
केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबरला अपहरण करण्यात आले होते. ते ज्या गाडीनं प्रवास करत होते, त्या गाडीला थांबवून सहा ते सात जणांनी त्यांचे अपहरण केले. यानंतर त्यांना जबर मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत.