पवारांच्या बालेकिल्ल्यात नेमकं काय घडणार? / नागवडेंचं बस्तान बसणार….?
माय नगर वेब टीम
श्रीगोंदा : अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक सर्वाधिक गाजते. त्याला कारणही तसचे आहे. श्रीगोंदा म्हणजे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारांची ठेवण असलेला तालुका. पवारांच्या आदेशाला शब्दप्रमाण मानणारा वर्ग या तालुक्यात मोठा असल्याचे यापूर्वीच्या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे. त्याच बरोच हा तालुका साखर सम्राटांचा तालुका ही दुसरी ओळख. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेक दिग्गजांनी तयारी चालविली आहे. परंतू, माजी राज्यमंत्री आणि विद्यमान अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या एन्ट्रीमुळे माजी मंत्री विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचे टेंन्शन वाढविले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी साजन पाचपुतेंना दिलेला शब्द यामुळे माजी आमदार राहुल जगताप यांची अडचण वाढली आहे. अजित दादांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीची तयारी करत असलेल्या जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे यांचे काय? असे एकना अनेक प्रश्नांनी श्रीगोंदेकरांच्या मनात काहूर उठले आहे.
आगामी विधानसभा निवडणुका या महायुती आणि महाविकास आघाडी एकत्रित लढतील असा अंदाज सध्या तरी राजकीय वर्तुळात बांधला जात आहे. तसेच जेथे ज्या पक्षाचा आमदार आहे तेथील जागा त्याच पक्षाला सोडायची असा कॉमन मिनीमम प्रोगॅम सर्वच पक्षांनी आणला असल्याचे सांगितले जाते. परंतू, काही मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात बदल होण्याची शक्यताही आहे. हे गृहीत धरुनच सर्व पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी चालविली आहे. अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल सप्टेंबर महिन्यात केव्हाही वाजू शकतो. त्या अनुषंगाने राज्यासह अहमदनगर जिल्ह्यातही पुढाऱ्यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. चार वर्ष बिळात घुसून बसलेले पुढारी आता हौशा नौशांना सोबत घेत मीच तूमचा कसा तारणहार? हे पटवून देत असल्याचे दिसून येत आहे. यात श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील पुढारी मंडळी मागे नाहीत.
श्रीगोंदा मतदारसंघातील सद्यस्थिती पहावयाची झालीच तर येथे भाजपाचे बबनराव पाचपुते विद्यमान आमदार आहेत. परंतू, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचा गेल्या पाच वर्षांंत मतदारसंघातील जनसंपर्क तूटला आहे. तसेच लोकसभेलाही या मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराला मोठा फसल्याचे वास्तव आहे. त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते, चिरंजीव विक्रम पाचपुते यांच्याकडून तयारी चालविली असली तरी पक्षश्रेष्ठींकडून त्यांना संधी मिळेलच की नाही याबाबत शंका आहे. हाच धागा पकडत जिल्ह्यात किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे शिवाजी कर्डिले यांच्याकडून राहुरी मतदारसंघाबरोबरच श्रीगोंदा मतदारसंघात चाचपणी सुरु आहे.
माजी आमदार राहुल जगताप यांच्या विजयातही कर्डिले यांचा सिंहाचा वाटा असल्याचे बोलले जाते. तर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाकडून जिल्हाध्यक्षा अनुराधाताई नागवडे यांनी बऱ्याच दिवसांपासून तयारी चालविली आहे. त्यांनी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून अजित दादांच्या उपस्थितीत विविध उपक्रमही राबविले आहेत. परंतू, हा मतदारसंघ सध्या भाजपाच्या कोट्यात असल्याने भाजपा हा मतदारसंघ अजितदादांना सोडते की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. महाविकास आघाडीतही हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला ते अद्याप स्पष्ट नसले तरी मध्यंतरी शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत श्रीगोंद्यात येत येथे शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुतेच उमेदवार असतील असे जाहीर करुन टाकले आहे. त्यामुळे लोकसभेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत असलेले माजी आमदार राहुल जगताप यांची मोठी अडचण झाली आहे. ते कोणती भूमिका घेता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याच बरोबरच काँग्रेसकडून घनश्याम शेलार तयारीत आहेत. जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनीही पत्रकार परिषद घेत आपण निवडणूक लढणारच असल्याचे स्पष्ट केले आहे.
एकंदरीतच श्रीगोंद्यात दुरंगी नव्हे तर तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यात माजी आमदार राहुल जगताप यांची नाराजी महाविकास आघाडीला महागात पडू शकते. शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते यांना निवडणूक हॅडेल करण्याचा अनुभव असला तरी ते पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरत आहेत. ते कितपत यशस्वी होतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना मानणारा मोठा वर्ग मतदारसंघात आहे. त्यांना भाजपाने तिकीट नाकारल्यास ते कोणती भूमिका घेतात हेही महत्वाचे आहे. त्यात किंगमेकर समजले जाणारे श्रीगोंद्यात का डोकं लावतात? याचे कोडे अद्याप उलगडलेले नाही. श्रीगोंदा मदारसंघातील सद्य परिस्थिती पाहता येथील निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे. पवार बालेकिल्ल्यात कोणाला पुढे करतात यावर बरेचसे गणित अवलंबून आहे. मात्र पाचपुते, जगताप यांची नाराजी महायुती आणि महाविकास आघाडीला महागात पडू शकते हे मात्र नक्की.