Tejashri Pradhan : मला आयुष्यात फक्त लग्न करायचं होतं, 25व्या वर्षी केलंही पण…, तेजश्री प्रधानने लग्नाविषयी मांडलं स्पष्ट मत

माय नगर वेब टीम
Tejashri Pradhan : अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि सुबोध भावेचा ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लग्नसंस्थेवर आधारित असलेल्या या सिनेमात प्रेक्षकांना आधुनिक विचारसरणी देखील पाहायला मिळणार आहे. तसेच बऱ्याच कालावधीनंतर मोठ्या पडद्यावरुन तेजश्री प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यामुळे सध्या तिच्या या सिनेमाची बरीच चर्चा आहे. असं असतानाच एका मुलाखतीमध्ये तेजश्रीने लग्नाविषयीचं तिचं मत मांडलं आहे.

तेजश्री ही ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून घरांघरांत पोहचली. त्याचवेळी तिने तिचा सहकलाकार शशांक केतकरसोबत आयुष्यभराची गाठही बांधली. पण वर्षभरातच शंशाक-तेजश्रीचा संसार मोडला आणि ते विभक्त झाले. त्यानंतर शशांकने त्याची मैत्रीण प्रियांका ढवळेसोबत लग्नगाठ बांधली, तर तेजश्री मात्र अद्यापही सिंगल आहे. नुकतच सिनेमाच्या निमित्ताने तेजश्रीने लोकमत फिल्मीसोबत संवाद साधला. त्यावेळी तिने लग्नाविषयीच्या मतावर भाष्य केलं आहे.

देवाने काहीतरी वेगळं ठरवलं होतं – तेजश्री प्रधान
कोणत्या वयात लग्न करणं योग्य आहे, असं तुला वाटतं? यावर बोलताना तेजश्री प्रधानने म्हटलं की, मला तर माझ्या 25तच लग्न करायचं ही, मी केलंही होतं. पण देवाचे काहीतरी वेगळे प्लॅन्स होते.पण माझ्या आताच्या वयातही सगळं छान आहे. आज जर मी जोडीदार निवडण्याचं ठरवलं तर एका वेगळ्या दृष्टीकोनातून मला त्याकडे पाहता येईल. मी लग्न केलं तेव्हाही माझ्या आईवडिलांनी अजिबात जबरदस्ती केली नाही. मला आयुष्यात लहानपणापासून लग्नच करायचं होतं. मला लग्न करायचं अशाच मूडमध्ये होते मी. मला माझ्या पंचवीशीत लग्न करायचंच होतं. मला होममेकरच व्हायचं होतं.

तेजश्री प्रधानविषयी…
लेक लाडकी या घरची,प्रेम हे,अग्गाबाई सासूबाई या मालिकांमध्ये तेजश्रीनं काम केलं आहे. तेजश्रीच्या होणार सून मी ह्या घरची या मालिकेतील जान्हवी या भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली. झेंडा, लग्न पाहावे करुन, शर्यत या चित्रपटांमध्ये तेजश्रीनं काम केलं. ती साध्या काय करते या चित्रपटामधील तेजश्रीच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. तेजश्री ही तिच्या नव्या प्रोजेक्टची माहिती चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देते. तेजश्रीच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. तेजश्रीला इन्स्टाग्रामवर 1.2 मिलियन फॉलोवर्स आहेत.