माय नगर वेब टीम
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने महाराष्ट्र हादरला आहे. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात माजी सरपंचावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे हल्लेखोरांनी माजी सरपंचाचे दोन्ही पाय तोडले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील शहापूर तालुक्यात असलेल्या कसारा भागातील अजनुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कदम उघडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. कदम उघडे हे काही कामानिमित्त 2 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता घरून एकटेच कारने जात होते.
यावेळी अजनुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गायधरा गावच्या माळरानात अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची कार अडवत दगडांचा मारा केला. यानंतर हल्लेखोरांनी कदम उघडे यांना कारमधून बाहेर काढत त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत कदम उघडे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या दोन्ही पायांना जबर मार लागल्याने त्यांना सुरुवातीला शहापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र डॉक्टरांनी त्यांचे पाय तुटले असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना कल्याण येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.
मात्र त्यांच्यावर हल्ला का झाला? कोणी केला? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. कदम उघडे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी कसारा पोलीस तपास करत असून लवकरच आरोपीला अटक केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गावित यांनी दिली.