विखेंचा खटका, लंकेंच्या जिव्हारी! लंके मांडणार राहात्यात ठाण…

लंके मांडणार राहात्यात ठाण / थोरात, लंके, कोल्हे पिपाडांच्या रणनितीने मंत्री विखेंचा पराभव शक्य?
माय नगर वेब टीम
अहमदनगर – नुकतीच लोकसभा निवडणूक झाली. या निवडणुकीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात बलाढ्य समजल्या जाणाऱ्या विखे पाटलांना नवख्या असलेल्या नीलेश लंके यांनी टक्कर दिली. विखे-लंके यांची लढत सर्वाधिक लक्षवेधी ठरली. त्याला कारणही तसेच आहे. बलाढ्य असणाऱ्या विखे पाटलांना येथे पराभवाला सामोरे जावे लागले. हा पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी शंकास्पद असलेल्या 40 ठिकाणीच्या मतदान केंद्रावरील ईव्हीएम व व्हिव्हिपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली. त्यासाठी विखे यांनी तब्बल 18 लाख 88 हजार रुपयेही भरले आहेत. तसेच लंके यांच्या खासदारकीला विखेंनी थेट हायकोर्टात आव्हान दिले आहे. विखे पाटलांच्या डोक्यातील लंकेंची खासदारकी घालवण्याचा खटका हा लंकेंच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. असे असले तरी नीलेश लंके यांची खासदारकी जाते की राहते याबाबत जिल्ह्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात डॉ. सुजय विखे पाटील यांचा पराभव होईल असे कोणालाच वाटत नव्हते. परंतू, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपला हुकमी एक्का नीलेश लंके यांना मैदानात उतरवरत विखे पाटलांचा पराभव करुन दाखवला. पवारांच्या जोडीने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचीही लंके यांना मोठी साथ मिळाली. शरद पवार यांनी लंकेंच्या विजयासाठी मतदारसंघनिहाय मेळावे घेत विखेंवर हल्लाबोल केला. लंकेंना उमेदवारी देऊ नका असा निरोपही विखेंनी एका उद्योजकामार्फत पाठविला होता असा गौप्यस्फोट केला. पवारांच्या या गौप्यस्फौटाने अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. दुसरीकडे तितक्याच ताकदीने पवारांना विखे पाटलांनी प्रतिउत्तर देत मुद्दाच खोडून काढण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात दोन्ही उमेदवारांकडून दिग्गज नेत्यांना मतदारसंघात आणत प्रचाराची राळ उडवली. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. निवडणुकीच्या शेवटच्या क्षणापर्यंत विखे व लंके दोघांकडूनही पूर्ण ताकदीचा वापर केला गेला. परंतू, निकाला अंती निलेश लंके यांनी सुजय विखे पाटलांचा सुमारे 29 हजारांच्या फरकाने पराभव केला. कार्यकर्त्यांसह विखे पाटलांनाही पराभव मान्य न झाल्याने त्यांनी संशयास्पद असलेल्या 40 मतदान केंद्रावरील ईव्हीएम व व्हिव्हिपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली. त्यासाठी तब्बल 18 लाख 88 हजार रुपयेही निवडणूक आयोगाला जमा केले.

लोकसभा निवडणुकीमध्ये विखे-लंके यांचा झालेला कडवा संघर्ष निवडणुकीनंतर शांत होईल असा असे वाटत होते. लंके यांनी विजयानंतर विविध ठिकाणी होत असलेल्या सत्कारावेळी आता झाल गेल विसरुन जायचं आणि विकासाची कामे मार्गी लावायची आहेत असे स्टेटमेंटही केले. जिल्ह्याच्या विकासासासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे आशिर्वाद घेणार असल्याचे ते म्हणाले होते. मात्र यास काही दिवसांचा कालावधी जात नाही तोच लंके यांनी विधानसभेला 12 /0 चा नारा दिला. दरम्यानच्या काळात डॉ. सुजय विखे पाटील यांनी नीलेश लंकेंच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान दिले. याचिकेतून मतदान केंद्रावरील मतमोजणीवर आक्षेप घेण्यात आला आहे. संबंधित 40 मतदार केंद्रावरील मतमोजणी योग्य पद्धतीने झालेली नाही. तसेच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नीलेश लंके व त्यांच्या प्रचारकांनी केलेली भाषणे विखे पाटलांची खोटी बदनामी करणारी आहेत. लंके यांनी दाखविलेला निवडणूक खर्च आणि प्रत्यक्ष खर्च याचा ताळमेळ दिसून येत नाही. मुद्रित प्रचारातील साहित्याचा खर्च त्यांनी दाखविलेला नाही. निवडणूक खर्चातील मर्यादेचे उल्लंघन केले आहे. आदी मुद्द्यांवर विखे पाटलांनी याचिका दाखल केली आहे. त्यावर आता सुनावनीही सुरु झाली आहे.

लोकशाहीने बहाल केलेली लंकेंची खासरदारकीच रद्द करण्याची मागणी विखेंनी केल्याने आता लंके यांनी आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे त्यांच्या स्टेटमेंटवरुन पहावयास मिळत आहे. लंके यांनी दिलेला 12 / 0 चा नारा, एकालाही सोडू नका असे बाळासाहेब थोरात यांच्यासमोर केलेले वक्तव्य, महापालिकेत आढावा बैठक घेत विखे फाऊंडेशनला पाणी पट्टीत दिलेली तीन कोटींची सूट याबाबत उपस्थित केलेला प्रश्न, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कांदा व दूधप्रश्नी केलेले आंदोलन…. त्यातून राज्यपातळीवर दूग्ध विकास मंत्री विखेंची केलेली कोंडी! अवैध धंद्यांविरोधात एसपी कार्यालयासमोर केलेले आंदोलन यावरुन आता लंके यांच्याकडून विखेंना टार्गेट केल्याचे बोलले जावू लागले आहे. ऐवढेच नव्हे तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपण राहात्यात ठाण मांडणार असल्याचे लंके यांचे स्टेटमेंटही बरेच बोलके आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही विखे-लंके यांचा संघर्ष पहावयास मिळाल्यास आश्चर्य वाटू नये.

आता राहिला प्रश्न तो लंके यांच्या खासदारकीचा? त्यासाठी आपल्याला 1991 मधील बाळासाहेब विखे विरुद्ध शरद पवार यांच्या न्यायालयीन लढाईत नेमकं काय झाले हे आपल्याला पहावे लागले. आताच्या लोकसभा निवडणुकीत विखेंचा पराभव झाल्याने त्यांनी लंकेंच्या खासदारकीला आव्हान दिले आहे. त्यामुळे विखे विरुद्ध गडाख इतिहासाची पुनरावृत्ती होणार तर नाही ना अशी चर्चा सुरु झाली आहे.

सन 1991 मध्ये गडाख-विखे यांच्यात झालेल्या लढाईत बाळासाहेब विखे पाटलांचा पराभव झाला. पवार जिंकले परंतू विखेंनी गडाखांच्या निवडीला आव्हान दिले. प्रचारा दरम्यान यशवंतराव गडाख आणि शरद पवार यांनी आपल्यावर खोटे आरोप केले, चारित्र्य हणन केले केल्याच्या आरोपांवर त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. विखे जे काही देतायत ते घ्या पण मतदान मात्र काँग्रेसलाच करा…‌’ असे आवाहन गडाख यांनी प्रचारसभेत केलं आणि आपली प्रतिमा डागाळण्याचा प्रयत केला, अशा विविध मुद्द्यांचा, आक्षेपांचा विखेंनी केलेल्या याचिकेत उल्लेख होता. खटला दोन वर्ष चालला. उच्च न्यायालयाने गडाख यांना खासदार म्हणून अपात्र ठरवत त्यांची निवड रद्द केली. बाळासाहेब विखे पाटलांना विजयी घोषित करुन टाकले. याच आधारावर आताही सुजय विखे पाटलांनी लंके यांच्या खासदारकीला आव्हान दिले आहे.

त्यावेळीही खरी लढत विखे विरुद्ध पवार अशीच होती. यावेळीही विखे विरुद्ध लंके नव्हे तर विखे विरुद्ध पवार अशीच होती. आताही पवार जिंकले असले तरी आता निवडणूक आयोग आणि न्यायालयात काय होते ते बघावे लागणार आहे.
खासदारकीच्या न्यायालयीन लढाईमुळे आता विखे विरुद्ध लंके यांच्यात टोकाचा संघर्ष पहावयास मिळू शकतो. विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यात लंके यांनी जिल्ह्यात 12/0 चा नारा दिला आहे. तसेच आपण राहात्यात ठाण मांडणार असल्याचे सुचक विधानही त्यांनी केले आहे. विवेक कोल्हेही पराभवाचा वचपा काढण्यासाठी तयार आहेतच. ममता पिपाडांनीही विखेंच्या विरोधात दंड थोपटले आहेत. त्यांनीही महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेटी घेतली आहे. त्यामुळे राहात्यात विखे पाटलांच्या विरोधात महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देते हे पाहणे महत्वाचे ठरणार असून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, खा. निलेश लंके, विवेक काल्हे, पिपाडा, घोगरे यांनी वर्ज्रमूठ बांधल्यास विधासभेला विखे पाटलांचा पराभव शक्य? असल्याचे आता बोलले जावू लागले आहे. वास्तविक पाहता राजकारणात बलाढ्य समजले जाणाऱ्या विखे पाटलांचा पराभव इतक्या सहजा सहजी होईल का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होवू लागला आहे.