…तर भाजपचा जिल्ह्यातून सुपडासाफ होणार! ; कसे राहील विधानसभेचे गणित, पहा

माय नगर वेब टीम
अहमदनगर – लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसतो ना बसतो तोच आता आता विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी राज्यातील विधानसभा निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लढविल्या जातील असा राजकीय कयास आहे. परंतू, ज्यांना उमेदवारीची संधी मिळणार नाही अशी अनेक मातब्बर नेतेमंडळी पक्षांतर करण्याची दाट शक्यता आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मिळालेले घवघवीत यश यामुळे महाविकास आघाडीतील पुढाऱ्यांमध्ये सध्या तरी आनंदाचे वातावरण आहे. त्याला कारणही तसेच आहे. राज्यात भाजपासह अजितदादांच्या राष्ट्रवादीला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा फटका बसला. यात अहमदनगर जिल्ह्यातील मातब्बर असणाऱ्या महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनाही बसला. त्यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले. राज्यातील राजकीय परिस्थती अशीच राहिल्यास आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातून भाजप हद्दपार होते की काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जावू लागला आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून काही महिने उलटत नाही तोच आता विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या चुका सुधारुन मायक्रो प्लॅनिंग करत भाजपाचे सावध भूमिका घेतल्याचे पहावयास मिळते. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला अर्थात सर्वाधिक भाजपाला मोठा फटका बसला. हे वास्तव आहे. शेतकऱ्यांविरोधी सरकार, मराठा आरक्षणाचा प्रश्न, शेतमालाला न मिळणारा हमीभाव, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाची केलेली वाताहात, पवार, ठाकरेंना मिळालेली सहानुभूती अशी महत्वाची मुद्दे महायुतीच्या अपयशाला कारणीभूत ठरली. याच मुद्द्यांमुळे भाजपासह मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेला व अजित दादांच्या राष्ट्रवादीला जबर दणका बसला. अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यातच नव्हे तर राज्याच्या राजकारणार मातब्बर समजल्या जाणाऱ्या विखे पाटलांनाही याचा झटका बसला. खासदार राहिलेल्या डॉ. सुजय विखे पाटील यांचा नीलेश लंके यांनी पराभव केला.

आगामी दोन महिन्यांवर येवून ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून विशेष करुन भाजपाकडून मायक्रो प्लॅनिंग करुन निवडणूक लढविण्याची तयारी चालविली आहे. वरिष्ठ पातळीवर जागा वाटपाची ताणाताणी सुरु आहे. अहमदनगर जिल्ह्याचे जबाबदारी दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे. येथील पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत. असे असले तरी लोकसभा निवणुकीत पवार-ठाकरे-थोरात यांनी नीलेश लंके यांना लोकसभेच्या आखाड्यात उतरवत विखेंना चारीमुंड्या चित केले. आणि त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही विखे पाटलांना चोहोबाजूने घेरुन अहमदनगर जिल्ह्यातून भाजपा हद्दपार करण्याची व्ह्यूवरचना महाविकास आघाडीकडून केली जावू शकते. त्यास विखे पाटलांचे विरोधक असणारे भाजपाचे युवा नेते विवेक कोल्हे यांची साथही महाविकास आघाडीच्या नेत्यांना मिळू शकते, असा कयास राजकीय वर्तुळात बांधला जात आहे. तसेच विखेंनी लंकेंच्या खासदारकीलाच न्यायालयात आव्हान दिल्याने लंके यांनीही विखेंच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यात 12/0 चा नारा दिला आहे. त्यानुसार खासदार नीलेश लंके यांनी तयारीही चालविली असल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरीच्या नगरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या कार्यक्रमात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासमोर लंके यांनी याचा पुर्नउच्चार केला. थोरात साहेब मी गाडीचा ड्रायव्हर होतो तुम्ही दारात उभे रहा, जिल्हातील एकालाही सोडू नका 12 ची 12 एकाच गाडीत बसून विधारनसभेत नेवू असे स्टेटमेंट केले. हे लंके यांचे स्टेटमेंट बरेच बोलके आहे. लंके यांचा रोख मंत्री विखे पाटलांकडे असल्याचे लपून राहिले नाही.

विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील नेतेमंडळींकडून तसेच राज्यातील नेतेमंडळींकडून विखेंना त्यांच्याच मतदारसंघात अडकवून ठेवण्याचा प्रयत्न केला जावू शकतो. सध्या जिल्ह्यात भाजपाचे तीन आमदार आहेत. त्यातील राधाकृष्ण विखे पाटील एक. तर बबनराव पाचपुते, मोनिका राजळे. पाचपुते यांना आजारपणामुळे भाजपा त्यांना संधी देईल असे वाटत नाही. राजळे यांच्या मतदारसंघात मराठा-ओबीसी संघर्षामुळे येथे राजळे यांना झटकाही बसू शकतो. राहुरीत तनपुरे यांचा पराभव करणे मोठे दिव्यच आहे. विखे पाटलांचा पराभव झालाच तर महाविकास विकास आघाडीच्या नेत्यांचे 12 / 0 चे स्वप्न पुर्णही होऊ शकते. जिल्हातून भाजपा हद्दपारही होण्याची शक्यता नाकारता येत नहा. परंतू, विखे मतदारसंघात अडकवून राहतील ते विखे कसले. त्यांच्यात राज्याचे राजकारण हलविण्याची ताकद असल्याने यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही ते विखे पॅटर्नचा खेळ उभा करतील असा अंदाज बांधला जात आहे. विखे पाटील विरोधकांना कसे अस्मान दाखवितात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

तर दुसरीकडे जिल्ह्यात महाविकासआघाडीला धोकाही होण्याचे चार्न्सेस मोठे आहेत. विखे पाटील किंगमेकरही ठरू शकता. ते कसे हे आपण पाहुयात… लोकसभा निवडणुकीमध्ये दणदणीत यश मिळाल्याने महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या मोठी आहे. उमेदवारीबाबत एकमत न झाल्यास नाराजीचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो. मतदारसंघ निहाय पाहिले तर पारनेमध्ये जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांना मानणारा मोठा वर्ग पारनेरमध्ये आहे. तसेच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले निवडणुकीची चाचपणी करत आहेत. ही मंडळी नाराज होऊन बाजूला गेल्यास त्याचा फटका महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसू शकतो. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जागा वाटपाच्या अगोदरच श्रीगोंद्यात येत उपनेते साजन पाचपुते यांची उमेदवारीच जाहीर करुन टाकली आहे. येथे माजी आमदार राहुल जगतापही मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यांची नाराजी महाविकास आघाडीला परवडणारी नाही. शेवगाव पाथर्डीतही माजी आमदार चंदशेखर घुले पाटील, हर्षदाताई काकडे यांची नाराजी अडचणीची ठरु शकते. नगर शहरात शशिकांत गाडे यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यांची नाराजी महाविकास आघाडीला परवडणारी नाही. राहुरीत सत्यजित कदम यांची नाराजी महायुतीला जड जाणारी आहे. अकोला मतदारसंघात महायुतीत भाजपाने माजी आमदार वैभव पिचड यांना उमेदवारी दिल्यास आमदार किरण लहामटे अजित दादांच्या राष्ट्रवादीपासून लांब जावू शकता. तर लहामटे यांना तिकीट दिल्यास पिचड भाजपापासून फारकत घेऊ शकतात. कोपरगावमध्ये काळे आणि कोल्हे हे दोघेही महायुतीत आहेत. आमदार अशुतोष काळे यांना तिकीट दिल्यास विवेक कोल्हे नाराज होतील. कोल्हेंना तिकीट दिल्यास काळे नाराज होतील. येथे कोणीही एक नाराज झाल्यास त्यांचा फटका महायुतीलाच बसेल. संगमनेर, राहात्यात नाराजीचा फारसा परिणाम जाणवणार नाही. परंतू एकमेकांना मतदारसंघातच अडकवून ठेवण्यासाठी व्यूवरचना आखली जावू शकते. असा अंदाज अहमदनगर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात बांधला जात आहे.