माय नगर वेब टीम
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे. यादरम्यान पोलिसांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. घटनेच्या वेळी आरोपींना मृत देशमुखांचे लोकेशन कोणी दिले? याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सिद्धार्थ सोनवणे याला अटक केली आहे.
सुदर्शन घुलेचा सहकारी मित्र सिद्धार्थ सोनवणे याने देशमुख यांचे लोकेशन आरोपी घुले आणि अन्य साथीदारांना दिल्याचे समोर आले आहे. हत्येच्या दिवशी केज शहरातून सरपंच संतोष देशमुख गावी निघाले असता सिद्धार्थ सोनवणे याने सुदर्शन घुले याला लोकेशन दिल्याचा पोलिसांना संशय आहे. गावातल्या व्यक्तीनेच आरोपींना देशमुख यांचा ठावठिकाणा सांगितल्याचा पोलिसांना संशय होता. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला.
पोलिसांच्या लोकेशन तपासाची भनक सोनवणेला लागताच त्याने आपला मोबाईल फोन बंद केला. पण कॉल रेकॉर्डचा इतिहास तपासून पोलिसांनी त्याचा माग घेतला. सिद्धार्थ सोनवणे हा फरार झाल्यानंतर मुंबईत लपून बसला होता. त्याने या काळात वेगवेगळी पाच सिम कार्ड देखील वापरली होती. अखेर पोलिसांनी त्याला मुंबईतून अटक केली.
कोण आहे सिद्धार्थ सोनवणे?
मस्साजोग गावातील सिद्धार्थ सोनवणे हा सुशिक्षित बेरोजगार ( वय अंदाजे ३५). सिद्धार्थ सोनवणे याचा इतिहास गुंड प्रवृत्तीचा आहे. त्याची आणि सुदर्शन घुलेची चांगली मैत्री होती. अनेक वेळा अनेक विषयांवर त्यांचे संभाषण होत असे.
देशमुखांच्या अंत्यविधीला होता उपस्थित
देशमुख यांचे लोकेशन घुले आणि त्याच्या अन्य सहकाऱ्यांना दिल्यानंतर सोनवणे हत्येनंतर झालेल्या रास्ता रोको आणि अंत्यविधीच्या कार्यक्रमाला देखील उपस्थित होता. सिद्धार्थ सोनवणे याचे आई वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांची आर्थिक परिस्थिती खूप बेताची आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबरला अपहरण करण्यात आले होते. ते ज्या गाडीनं प्रवास करत होते, त्या गाडीला थांबवून सहा ते सात जणांनी त्यांचे अपहरण केले. यानंतर त्यांना जबर मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत.