तोपर्यंत धनंजय मुंडेंना बिनखात्याचे मंत्री करा; आमदार सुरेश धस नेमकं काय म्हणाले पहा

माय नगर वेब टीम
छत्रपती संभाजीनगर – सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र मंत्रिमंडळात बिनाखात्याचे मंत्री म्हणून राहावे, अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी शुक्रवारी येथी केली. मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हे सध्या पोलिस कोठडीत आहेत.

त्यामुळे, मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. तथापि, अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी असलेल्या मुंडेंनी मात्र गुरुवारी आपली भूमिका स्पष्ट करताना, माझ्या मंत्रीपदामुळे या प्रकरणावर कुठलाही प्रभाव पडणार नाही असे स्पष्ट केले आहे.

धस यांनी याप्रसंगी बोलताना, खून आणि खंडणी प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकातील (एसआयटी) काही सदस्यांचा समावेश करण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले, या कमिटीतील एक सदस्य गडचिरोलीतून बदली करून आलेला आहे.

या व्यक्तीने आपल्या मालकावर भक्ती दाखवू नये. कमिटीतील काही लोकांचे त्यांच्याशी (कराड) संबंध आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांवर माझा आक्षेप नाही, पण मला खालच्या दर्जाच्या सदस्यांच्या प्रामाणिकतेबाबद शंका आहेत. मी ही गोष्ट मुख्यमंत्र्यांना कानावर घातली आहे, त्याचा आढावा घेतला जाईल.