विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरकरांनी अनुभवला दहीहंडीचा थरार | डीजेच्या दणदणाटात गाण्याच्या ठेक्यावर तरुणाई थिरकली | अभिनेत्रींच्या अदांवर नगरकर फिदा / भावी आमदारही नाचले तरुणांच्या डोक्यावर
माय नगर वेब टीम
नगर शहरात दरवर्षीपेक्षा यंदाचा दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि दणक्यात साजरा झाला. त्याला कारणही तसंच होतं. अवघ्या दोन महिन्यांवर येवून ठेपलेली विधानसभेची निवडणूक मुख्य कारण. दोन महिन्यानंतर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची दहीहंडी आपणच फोडणार असल्याचा दावा नगरकच्या गोविदांनी दहीहंडी उत्सावातून शक्तीप्रदर्शन करत ठोकलाय. त्यास दहीहंडी उत्सवात सहभागी झालेले बालगोपळ साक्षी आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. थरांचा थरथराट करत गोविंदांनी दहीहंडी फोडली खरी पण विधारनसभा निवडणुकीची दहीहंडी कोण फोडणार असा रोकडा सवाल आता नगरकर उपस्थित करु लागले आहेत.
बोल बजरंग बली की जय…. गोविंदा रे गोपाळा असे म्हणत पुणे, मुंबईच्या गोविंदांनी नगरच्या दहीहंडी उत्सवामध्ये सहभाग नोंदवला. थरांचा थरथराट करत डीजेच्या तालावर ठेकाही धरला. सिने तारकांच्या, अभिनेत्रींच्या अदांवर बाल गोपाळही जाम फिदा झाले. गोविंदांना प्रोत्साहन देत अभिनेत्रींनीही ठेका धरत तरुणाईचा जोष वाढवला. हजारो तरुण बेधुंद थिरकली. परंतू, थिरकण्यामागे आगामी विधानसभा निवडणुकीचा राजकीय शक्तीप्रदर्शनाचा वास होता हे मात्र लपून राहिले नाही. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नगरमध्ये अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाला भावी आमदारांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्यही केले होते. त्यातूनच दरवर्षी पेक्षा यंदाचा दहीहंडी उत्सव मोठ्या दणक्यात साजरा झाला.
नगरमध्ये प्रेरणा प्रतिष्ठान व आमदार संग्राम भैय्या जगताप सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज चौक माळीवाडा येथे दहीहंडीचे आयोजन केले होते. या दहीहंडीला अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांचे मुख्य आकर्षण राहिले. येथे आमदार संग्राम जगताप यांचे भव्य राजकीय शक्तीप्रदर्शन दिसून आले. तर गोविंदांचा थरांचा थरथराट पहावयास मिळाला. दुसरीकडे माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या नियोजनाखाली श्रीयोग प्रतिष्ठान यांनी दहीहंडी उत्सवासाठी अभिनेत्री केतकी माटेगांवकर व अभिनेत्री एली अवरामसह सुप्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांनी आमंत्रित करुन गोविंदांचा उत्साह वाढविला. तसेच राजकीय शक्तीप्रदर्शन करुन ताकद दाखवून दिली.
सावेडी उपनगरातील राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली संघर्ष प्रतिष्ठानच्यावतीने अभिनेत्री ईशा माळवे, रील स्टार प्रतीक्षा बनकर, सिने अभिनेत्री सोनाली सोनावणे, रील स्टार शोनाई इंगळे यांना नगरमध्ये आणत गोविंदाचा उत्साह वाढविला. तसेच तालयोगी वाद्यपथक याचे स्थिर वंदनही झाले. नगरसेवक अजिंक्य बोरकर यांच्या अजिंक्य युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवास अभिनेत्री केरला स्टोरी अदा शर्मा यांची प्रमुख उपस्थित होती. केडगावचे नगरसेवक मनोज कोतकर यांच्या जगदंबा तरुण मंडळ व शिवमुद्रा ग्रुपच्या दहीहंडी उत्सवात अभिनेत्री तेजश्री प्रधान मुख्य आकर्षण ठरले. यांसह अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सव मोठ्या थाटात साजरा झाला. त्यातून होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचे राजकीय शक्तीप्रदर्शन पहावयास मिळाले. सर्वच ठिकाणी तरुणाईने डीजेच्या तालावर ठेका धरल्याचे पहावयास मिळाले.
या उत्सवातील दहिहंडी मुंबई, पुणे, नगरच्या गोविदांनी फोडली. परंतू, खरी नगर शहरातील विधानसभा निवडणुकीची दहीहंडी कोण फोडणार असा सवाल
नगरकर करत आहेत. दहीहंडी उत्सवातून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न आमदार संग्राम जगताप यांच्यासह माजी महापौर अभिषेक कळमकर, भगवान फुलसौंदर, शहर प्रमुख संभाजी कदम, विक्रम राठोड, बाळासाहेब बोराटे, किरण काळे यांनी केला. त्यातूनच विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या सर्वांनी आपण विधानसभा निवडणुकीची दहीहंडी फोडणार असल्याचा दावा छातीठोकपणे केलाय. तसेच माजी महापौर संदीप कोतकर यांच्या एन्ट्रीने अनेकांना हादरा बसलाय. असे असले तरी अजून दोन महिन्यांचा अवधी विधानसभा निवडणुकीसाठी आहे. सध्या तरी महायुतीतील अजित दादांच्या राष्ट्रवादीकडून आमदार संग्राम जगताप यांचे नाव अंतिम मानले जाते. परंतू, महाविकास आघाडीमध्ये नगरची जागा कोणाच्या वाट्याला जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. येथील जागेवर शिवसेनेचे प्रबळ दावा सांगितला आहे. काँग्रेस, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही येथील जागेची मागणी केलीय. परंतू त्यास यश येईल असे वाटत नाही. येथील लढत आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना अशी होईल असा राजकीय अंदाज बांधला जातोय. आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात शिवसेनेचा कोणता भिडू भिडणार हे पाहण्यासाठी अजून दोन महिने वाट पहावी लागणार आहे. इतकेच….